Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
ADVERTISEMENT
Advertise with us

गरिबाला त्याचा मनोभंग होण्यापासून वाचविण्याच्या प्रयत्नात आहे डॉक्टर ‘राकेश यादव’!

देशात आणि जगात ह्रदयाचे डॉक्टर तर पुष्कळ आहेत, मात्र त्यातील फार थोडे मोठ्या मनाचे असतील, ज्यांच्या मनात गरिबांसाठी कणव असेल. राकेश यादव त्यापैकी एक आहेत. भारतीय आयुर्विज्ञान संस्थान येथे हृदयरोग विभागात प्रोफेसर पदावर कार्यरत डॉ राकेश यादव खूप मोठ्या संकल्पासाठी आणि लक्ष्य घेवून जगत आहेत. त्यांना त्यांच्या जिवित कार्यात हृदयावरील इलाज इतका स्वस्त करायचा आहे की, कुणाही गरिबाला त्यासाठी वंचित राहावे लागू नये. आपल्या व्यवसायावर त्यांचे प्रेम आहे, मात्र त्याचे व्यावसायिकरण होताना पाहून त्यांच्या मनाला ठेच लागते. त्यांच्या या व्यवसायात तन मन धन लावून काम करण्यास त्यांच्या मातापित्यांच्या संस्काराचा मोठा वाटा होता. मागास समजल्या जाणा-या मध्यमवर्गीय समाजातून जन्माला येताना त्यांना परोपकार समाजसेवा आणि दयाबुध्दीची देणगी आपल्या पित्याकडून वारश्यानेच मिळाली आहे. तर त्यागाची शक्ति आईकडून मिळाली आहे. वेगवेगळ्या वळणावर भेटलेल्या व्यवसायातील डॉक्टर गुरूंच्या मार्गदर्शनातून जीवनाचे खरे उद्देश त्यांना समजले. आपल्यातील कौशल्य आणि अनुभवाचा गरिबांच्या सेवेसाठी उपयोग करत असलेल्या डॉक्टरांच्या जीवनानुभवात अशा काही रोचक आणि प्रेरणादायी गोष्टी आहेत ज्या ऐकल्या वाचल्यावर अनेकांना जीवनाचा मार्ग सापडू शकतो.

गरिबाला त्याचा मनोभंग होण्यापासून वाचविण्याच्या प्रयत्नात आहे डॉक्टर ‘राकेश यादव’!

Thursday April 06, 2017 , 13 min Read

उत्तरप्रदेशच्या फैजाबाद मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या मध्यमवर्गिय कुटूंबात वडील लिमिटेड कंपनीत नोकरी करत होते. त्यामुळे त्यांच्या नेहमी बदल्या होत असत. आईनेही चांगले शिक्षण घेतले होते तरी घरच्या जबाबदा-या सांभाळण्यासाठी त्यांनी नोकरी केली नाही. जर त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली असती तर कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयात त्यांना ती सहजपणे मिळाली असती. कारण त्या एमए एमएड होत्या मात्र त्यांनी ती मुलांचा सांभाळ नीट व्हावा म्हणून करायची टाळली.


image


राकेश हे आई वडीलांचे प्रथम अपत्य होते त्यांच्या पाठीवर तीन बहिणी होत्या, राकेश यांचे मामा हिंदी मध्ये विख्यात कवी, साहित्यिक आणि राजकीय नेता उदयप्रतापसिंह आहेत. ते समाजवादी पार्टीचे नेताजी मुलायमसिंह यादव यांचे गुरू आहेत. डॉ राकेश यांचे आजोबा डॉ हरिहरसिंह चौधरी त्यांच्या काळातील होमिओपॅथीचे प्रसिध्द डॉक्टर होते. त्यांच्याकडे शिकोहबाद येथे दूरवरून लोक उपचार करण्यासाठी येत होते. लहानपणी वडिलांची बदली बिहारच्या गया येथे झाल्याने राकेश यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. सातवी पर्यंत त्यांनी तेथे शिक्षण घेतले. त्यानंतर वडीलांची बदली उत्तरप्रदेशात गोंडा येथे झाली त्यामुळे त्यांना तेथे यावे लागले. तेथे त्यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच राकेश अभ्यासात हुशार होते हे त्यांच्या आई वडीलांसाठी भूषण होते. त्यांच्यात काही सवयी देखील होत्या त्यापैकी एक होती ती मोठे झाल्यावर देखील कायम राहिली. ती म्हणजे गप्पा मारण्याची सवय जी आजही कायम आहे. शाळेत असतानाही ते सोबत्यांबरोबर खूप गप्पा मारत त्यामुळे शाळेच्या प्रगती पुस्तकात शिक्षकांना लिहावे लागे की, “ मुलगा हुशार आहे पण खूप चंचल आणि गप्पिष्ट आहे”. राकेश सांगतात.

ते खरोखरच चंचल स्वभावाचे होते आणि लहानपणीच्या प्रत्येक गोष्टीत त्यांचा सहभाग होता. तरी देखील ते अभ्यासासाठीही वेळ काढत होते. हायस्कूलमध्ये येईपर्यंत त्यांना रोज चार तास अभ्यास करण्याची सवय लागली होती. एखाद दिवशी काही कारणाने त्यांना वेळ देता आला नाहीतर दुस-या दिवशी त्याची भरपाई करण्यासाठी ते जास्तवेळ अभ्यास करत असत. असे मात्र नाही की त्यांना केवळ अभ्यासातच रूची होती. खेळातही ते अग्रेसर होते, क्रिकेट, हॉकी टेबल टेनिस या खेळात ते निपूण खेळाडू होते. बुध्दीबळाच्या खेळातही बुध्दीकौशल्याने ते प्रतिस्पर्धकाला नामोहरम करत होते. शाळेत होणा-या स्पर्धामध्ये भाग घेणे आणि प्राविण्य मिळवणे ही तर त्यांना जणू सवयच लागली होती. त्यांच्या उत्कृष्ट संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीला ते आपलेसे करून घेण्यात निष्णात होते. वाद विवाद किंवा वक्तृत्व स्पर्धेत त्यांना बक्षीस ठरलेले असे कारण जे काही बोलायचे त्यात आत्मविश्वास आणि स्वत:ची दमदार शैली त्यांना उपजत होती.


image


सुरूवातीपासून राकेश यांना गणित आणि विज्ञान या विषयात रूची होती. इतरांसाठी जरी हे विषय कठीण असले तरी राकेश यांना आवडीचे होते. त्यामुळे ते लहान वयातच गणित विषयातही पारंगत झाले. वैज्ञानिक बाबी देखील त्यांना भावत होत्या.

राकेश यांच्या बाबतीत आणखी चांगली गोष्ट अशी की ते रात्रीच्या वेळी अभ्यास करत ज्यावेळी घरात सारे दिवे बंद करून झोपण्याची तयारी करत त्यावेळी राकेश त्यांचा अभ्यास करण्यास बसत. शाळेतून आल्यावर सारावेळ खेळण्यात जात असे मात्र रात्री अभ्यास करत असत. राकेश यांच्या मते, “ जेव्हा मी अभ्यास करत असे त्यावेऴी सारे लक्ष त्यातच असे, रात्री अभ्यास करण्याचे सर्वात मोठे कारण हे होते की, त्यावेळी शांतता असते, आणि जरी त्यावेळी अभ्यासाला सुरूवात केली आणि कुणी ढोल वाजवला तरी त्याचा मला काही त्रास होत नव्हता.”


image


या एकाग्रतेचा परिणाम म्हणून दहावीच्या परिक्षेत त्यांना राज्यात गुणवत्ता यादीत नाव कमाविता आले. कोणत्याही शिकवणी शिवाय त्यावेऴी ते उत्तर प्रदेशातून नवव्या क्रमांकाने उत्तिर्ण झाले होते. त्यांच्या या यशाने त्यांच्या पालकांनी त्यांना डॉक्टर करण्याचे ठरविले. गणितात रूची असूनही त्यांनी पालकांच्या स्वप्नपूर्तीसाठी डॉक्टर होण्याची तयारी सुरू केली. १९८५ मध्ये त्यांच्या वडीलांची बदली गोरखपूर येथे झाल्याने तेथील राघवदास गोरखपूर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. एमबीबीएसच्या अभ्यासादरम्यानही त्यांच्या प्रतिभा, क्षमता आणि एकाग्रता यांची चुणूक दिसून आलीच. त्यामुळेच या परिक्षेतही ते अव्वल राहिले. त्यातही गमतीदार म्हणजे हुशार आणि अभ्यासात पहिले असतानाही राकेश महाविद्यालयाच्या वर्गात मात्र मागच्या बाकावर बसत. एम्स परिसरात त्यांच्याशी झालेल्या खास मुलाखती दरम्यान त्यांनी त्यांच्या जीवनातील अशा अनेक रहस्यांचा खुलासा केला.

एके दिवशी त्यांच्या गोरखपूरच्या महाविद्यालयात शरीरशास्त्राचा वर्ग सुरू होता. या विभागाचे मुख्य डॉक्टर विद्यार्थ्यांना चिर-फाड संबंधी विषय शिकवत होते. एनाटोमीचे ते शिक्षक कडक शिस्तीचे होते, त्यांची नजर अचानक राकेश यांच्यावर गेली. राकेश यांचे डोळे बंद होते, शिक्षकांना वाटले ते झोपले असावेत, रागवून त्यानी राकेश यांना वर्गाबाहेर हाकलून देण्याचे फर्मान दिले, मात्र राकेश यांनी आपण झोपलो नाही असे सांगत मागच्या दहा मिनिटांत शिक्षकांनी जे काही सांगितले ते सारे म्हणून दाखवले. शिक्षक स्तंभित झाले कारण त्यांचा शब्द आणि शब्द जसाच्या तसा त्यांना पुन्हा ऐकायला मिळाला होता. या घटनेतून हेच सिध्द झाले की, राकेश यांची बुध्दिमत्ता आणि स्मरणशक्ती कमालीची होती.


image


वैद्यकीय महाविद्यालयातही राकेश सर्वच गोष्टीत पुढाकार घेत असत, खेळ असो किंवा बुध्दिबळाचा डाव, वाद विवाद किंवा निंबंध लेखन त्यांचा पुरस्कार हा नक्कीच असे. त्यामुळे महाविद्यालयाच्या वार्षिकोत्सवात ज्यावेळी स्पर्धा होत असत त्यात त्यांना इतके पुरस्कार मिळत की ते हातात पकडून सांभाळणे कठीण जात असे, राकेश यांनी सर्वाचे मन जिंकून घेतले होते.

एकदा तर वार्षिकोत्सवात राकेश यांनी त्यांच्या नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व यांचा परिचय करून दिला होता. त्याचे झाले असे की कार्यक्रमासाठी निधीचा तुटवडा होता, थोड्याश्या पैशात हा कार्यक्रम कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. ही गोष्ट समजताच राकेश यांनी हे आव्हान स्विकारले, त्यांनी त्यांच्या बुध्दी कौशल्याला पणास लावले, त्यांनी सहकारी मित्राना सोबत घेतले आणि कामाला लागले. हाती पैसे कमी होते त्यामुळे कमी खर्चात सारे भागवायचे होते, त्यावेळी राकेश यांच्या मनात कुल्हड वरून कल्पना सूचली, त्यांनी त्यातूनच सारी सजावट केली, त्यांच्या या सूंदर सजावटी पाहून सा-यांनी त्यांना दाद दिली. यातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की ते आपत्ती व्यवस्थापनातही माहीर होते.


image


एमबीबीएस मध्ये चांगल्या प्रकारे गुणवत्ता मिळवल्यानंतर राकेश यांनी एमडी च्या अभ्यासाकरीता सरोजीनी नायडू वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. सुरूवातीला त्यांचे मन हाडांच्या उपचारात रमले होते, मात्र आई- वडिलांच्या सल्ल्याने त्यांनी नंतर जनरल मेडिसीन या विषयाला मुख्य विषय म्हणून निवडले. आगरा वैद्यकीय महाविद्यालयात असताना घडलेल्या एका प्रसंगाने त्यांना सेवा करण्यासाठी आणि मृत्यूचा सन्मान करण्यासाठी जीवन समर्पित करण्याची प्रेरणा मिळाली. राकेश म्हणाले की, आगरा वैद्यकीय महाविद्यालयात डी के हाजरा नावाचे प्रोफेसर होते. ते विभाग प्रमुख होते. राकेश यांना त्यांच्या सोबत रुग्णांच्या देखभालीसाठी रूग्णालयात चक्कर मारायला मिळत असे. एकदा अशाच देखभालीच्या वेळी एक रूग्ण दगावला होता, ज्यावेळी प्रोफेसरांना हे लक्षात आले ते त्या रूग्णाच्या पलंगाजवळ गेले आणि त्याचे उघडे डोळे बंद केले. हातापायातील पट्ट्या सोडल्या, हाताला टोचलेल्या सुया काढल्या, त्या नंतर प्रोफेसर राकेश यांना म्हणाले की, “ जे लोक मृत्य़ूचा सन्मान करत नाहीत ते जीवनाचाही सन्मान करू शकत नाहीत,” त्यांची ही गोष्ट राकेश यांच्या मनात कायमची कोरली गेली.

आई वडीलांच्या हट्टासाठीच ते हृदयाचे डॉक्टर झाले. त्याकाळी ह्रदयाचा डॉक्टर होणे म्हणजे समाजात प्रतिष्ठेचे समजले जात असे. त्यामुळे आई वडीलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यानी एम्स मध्ये डिएमच्या प्रवेशासाठी तयारी सुरू केली. नेहमी प्रमाणे त्यांनी जोरदार तयारी केली, आणि त्यांना पहिल्याच प्रयत्नात प्रवेश मिळाला. महत्वाचे म्हणजे त्या काळी कार्डीओलॉजी या विषयाच्या दोनच जागा होत्या, मात्र राकेश यांना इतके चांगले गुण होते की त्या बळावर त्यांनी इतर सा-या विद्यार्थ्यांना मागे टाकले. तोंडी परिक्षेतही त्यांना चांगले गुण मिळाले होते. कार्डियोलॉजी मध्ये डीएम स्पेशालिस्ट पदवी घेवुन ते एम्स मध्येच कायम राहिले. सहायक प्राध्यापक म्हणून त्यानी आपल्या जीवनाची सुरूवात केली, एम्स मध्ये त्यांनी अनेक रूग्णांवर उपचार केले आणि त्यांना जीवनदान दिले आहे. अनेक कठीण समस्या सोडविल्या आहेत.


image


एका प्रश्नाच्या उत्तरात राकेश म्हणाले की, “ प्रत्येक रूग्ण माझ्याकरीता नवे आव्हान घेवून येतो, मी माझ्या कडून प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो, जेणे करून त्यांना नतंरही काही तक्रार राहू नये. मी स्वत:ला त्याचा नातेवाईक असल्याप्रमाणे समजून त्यांच्या दु:खात सहभागी होण्याचा प्रयत्न करतो, आणि नंतर सारी शक्ति लावून त्याला बरा करण्यासाठी शर्थ करतो. मला माहिती आहे की जराशी चूक देखील कुणाच्या तरी जीवनाला नष्ट करण्याचे कारण होवू शकते, त्यामुळे प्रत्येक निर्णय घेताना त्याचा संबंध जीवन आणि मरण यांच्याशी संबंध ठेवणारा असतो हे मला समजते, केवळ माझ्या एका चुकीने जीवनाला मृत्यूचे रूप मिळू शकते”.

राकेश या गोष्टीबाबत काहीच हातचे न राखता सांगतात की त्यांच्या निकटवर्तीयांच्या उपचारांसाठी त्यांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागते. ते म्हणतात की, ‘ ओळखीच्या लोकांशी भावनिक नाते असते, त्यांचा इतरांपेक्षा जास्त भरोसा आणि अपेक्षा माझ्याकडून असतात, त्यामुळे पूर्ण झाल्या नाहीत तर त्यांच्या समोर जाताना अस्वस्थता जाणवते, त्यामुळे परिचितांचा उपचार करताना माझ्या उरात धडधडते. मात्र असेही नाही की माझ्या वरील जबाबदारीने मी स्वत:ची काळजी जास्त करू लागतो, मात्र मला जास्त काळजीपूर्वक काम करावे लागते.”


image


जवळच्या लोकांच्या उपचारा दरम्यान मनाची कशी अवस्था होते ते सांगताना राकेश यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली, “ राकेश यांच्या खास मित्राच्या वयस्कर वडिलांना छातीत दुखत होते, त्यांना वाटले की ऍसिडिटी असेल, त्यांनी त्यासाठी औषध घेतले तरी सुध्दा आराम पडला नाही त्यावेळी राकेश यांना फोन करण्यात आला. लवकरात लवकर त्यांना रूग्णालयात भर्ती करावे असा मी सल्ला दिला. त्यांचा मित्र ज्यावेळी वडिलांना घेवून एम्स मध्ये पोहोचला त्यावेळी राकेश यांनी लगेच इसीजी केले. त्यात स्पष्ट झाले की त्याच्या वडिलांना ह्रदयाचा जोरदार धक्का बसला आहे. राकेश यांनी तातडीने कॅथ लॅबमध्ये त्यांना नेण्याची तयारी केली. इतक्यात मित्राचे वडील चक्कर येवून खाली पडले. त्याना लगचे स्ट्रेचरवरून कॅथ लॅबमध्ये नेण्यात आले. राकेश यानी योग्यवेळी योग्य ते उपचार करून मित्राच्या वडिलांचे प्राण वाचविले. त्या प्रसंगाबाबत सांगताना ते म्हणाले की, जर त्यांना काही झाले असते तर मला खूपच वाईट वाटले असते ते बरे झाल्यावर त्यांनी आणि माझ्या मित्रानेही मला सांगितले की त्यांनी इतका घाबरलेला मला कधीच पाहिला नव्हता. तसा तर मी नेहमीच चिंता करतो घाबरतो, पण ज्यावेळी परिचितांच्या उपचारांची वेळ येते त्यावेळी स्थिती वेगळीच होवून जाते. त्यामुळे माझ्या उरात धडधड नेहमी पेक्षा जास्त वाढते.

हजारो नादुरूस्त हृदयांवर उपचार केलेल्या डॉ राकेश यांनी एक रोचक गोष्ट सांगितली, “ हृदय अजब गोष्ट आहे ते कसे काम करते ते सा-यांनी जाणले आहे मात्र ते आजारी कसे होते त्याचे खरे कारण अद्यापही कुणाला सापडले नाही. त्यासाठी जगभरात खूप संशोधन सुरू आहे अपेक्षा आहे की केव्हा तरी हे सुध्दा समजेलच की ते का खराब होते. मात्र आज तरी दावा करून त्याबाबत योग्य ते कारण सांगू शकत नाही. मी खूप असे लोक पाहिले आहेत जे सिगरेट तंबाखू काहीच सेवन करत नाहीत. ते व्यायाम करतात, शाकाहार करतात, त्यांच्या जगण्याच्या सवयी सुध्दा सात्विक असतात. मात्र त्यांनाही हृदयविकार होतो. काही लोकांना तर लहान वयातच हा आजार होतो आहे, ही म्हण खरंच प्रत्ययकारी आहे की, ‘ हृदयाला कुणी समजू शकत नाही’ खरेतर ही म्हण सामान्यत: मुलींच्या बाबतीत सांगितली जाते मात्र पुरूषांच्या बाबतीत सुध्दा ती तितकीच खरी आहे.”


image


हृदय आणि मेंदू यांच्या संबंधाबाबत विचारणा करता ते म्हणाले की, हृदयाचे सारे कार्य मेंदूतून नियंत्रित होत असते, मात्र हृदयाचे असे आहे की जर त्याने ३० सेंकद जरी धडकणे थांबवले तरी माणसाचा मेंदू सुध्दा काम करायचे थांबवितो आणि माणूस मरतो. शरीराचे इतर अवयव आराम करू शकतात मात्र हृदय नाही, ‘हृदयाचे ऐकाल तर खूश रहाल आणि मेंदूचे ऐकाल तर प्रगती कराल’ असे म्हटले जाते. असे सांगून राकेश पुढे म्हणाले की, मी तर माझ्या मनाचे ऐकतो जे मला योग्य वाटते, जर माझ्या आजूबाजूचे लोक खूश तर मी खूश असतो, माझा नेहमी हा प्रयत्न असतो की, माझ्या समोर जो कुणी असेल तो खूश राहिला पाहिजे. लोक ज्यावेळी माझ्या कामाने सुखी होतात त्यावेऴी मला खरा आनंद मिळतो.” राकेश यांना इतर जनांचे दु:ख पाहून खूप त्रास होतो. मग ते दूर करावे म्हणून ते वाटेल ते प्रयत्न करतात. ते म्हणतात, ‘तसे तर मी काही सा-या लोकांचे दु:ख दूर करू शकत नाही, पण माझ्या मनाला हवे असते की, जास्तीत जास्त लोकांचे दु:ख मला दूर करता यावे.”

राकेश यांच्या मनात आणखी एक शल्य सलत असते, ते म्हणजे भारतात आजही हृदयावरील उपचार महाग आहेत, सामान्य माणसांच्या ते आवाक्या बाहेर आहे. या मध्ये लाखो रूपयांचा खर्च येतो, उपचार करायला आर्थिक स्थिती नाही म्हणून लाखो लोक रोज मरण पावतात. गरीबीच्या कारणाने त्यांचे हृदय काम करण्याचे थांबवते आणि योग्य इलाज न झाल्याने त्यांचे जीवन संपते.

राकेश यांचा प्रयत्न आहे की देशात हा उपचार स्वस्तात व्हावा, त्या दिशेने भारत सरकारने काही पावले टाकल्याचा त्यांना आनंद आहे, रक्तवाहिन्यातून रक्त वाहून नेणा-या ह्रदयातील जागा बंद पडतात किवा ब्लॉकेजेस होतात त्यावेळी त्यांना स्टेंट टाकून पूर्ववत केले जाते मात्र या स्टेंटची किंमत कमी करण्याचा प्रस्ताव नुकताच सरकारने दिला आहे. सरकारने यासाठी लागणारी अन्य सामुग्री देखील कमी किमतीत मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत, त्यामुळे उपचारा अभावी लोकांचा मनोभंग होतो ते बंद होईल हेच माझे स्वप्न आहे असे ते म्हणाले.”

भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विद्यार्थ्यांना हृदयाबाबत त्याच्या उपचारांबाबत शिकवणा-या या महान जाणत्याने सांगितले की, ‘ देशात हृदयाच्या विकाराने त्रस्त लोकांची संख्या सतत वाढत आहे, प्रत्येक तीनपैकी एकजण या विकाराने ग्रस्त आहे. आठ पैकी एक जण मधुमेहाने बेजार आहे. हृदय विकाराच्या बाबतीत देशाची स्थिती वाईट आहे आणि तिने ज्वालामुखी सारखे रूप धारण केले आहे.”

या प्रसिध्द डॉक्टरांचे मन यामुळे दु:खी होते की, काही लोकांनी या व्यवसायाला धंदा बनविले आहे. त्यावर बोलताना राकेश म्हणाले की, ‘ माहित नाही का काही लोकांनी या व्यवसायाला धंदा बनविले आहे, त्यांना यात प्रेम सेवा दिसत नाही व्यापार दिसतो. एक असा व्यवसाय जेथे लोकांचे दु:ख हलके करता येते त्याची सेवा करता येते. मात्र काही लोक यालाच संधी बनवून फायदा घेतात. मी प्रत्येक डॉक्टरला सांगतो- ‘याला व्यापार बनवू नका, यातून प्रेम सेवा करायला शिका आणि लोकांकडून त्याचे प्रेम मिळवा’ आपले हे म्हणणे जोरदारपणे सांगताना ते त्यांचे मामा उद्यप्रतापसिंह यांचा शेर ऐकवितात.

‘ख्वाइशों का सिलसिला बेशक बढ़ा ले जाएगा , सोचता हूँ इंसान दुनिया से क्या ले जाएगा

तुम किसी की खामियों का क्यों लगाते हो हिसाब, वो अपनी करनी का हिसाब खुदबखुद ले जाएगा ’

वैद्यकीय क्षेत्रातील डॉ राकेश यांच्या सेवा कार्याचा अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मान केला जात असतो. देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशचा सर्वात मोठा सन्मान यशभारती देखील त्यांना देण्यात आला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी दिला जाणारा डॉ बी सी राय पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. हृदयांच्या उपचारासंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनपर लेखनालाही जगभरात मान्यता आणि सन्मान मिळाला आहे. हृदय विकारापासून कसे वाचता येईल यासाठी उपाय सांगण्यासाठी ते नेहमी दृकश्राव्य माध्यमातून जात असतात.

त्यांच्या सा-या यशाचे श्रेय ते आई वडील आणि गुरूजनांना देतात. ते म्हणतात की, “ सुरूवातीपासून चांगले संस्कार मिळाले, घरातून असे वातावरण मिळाले ज्यातून प्रेरणा मिळाल्या, त्यामुळे जीवनात काही वेगळे मोठे करण्याचा ध्यास घेतला. माझ्या वडीलांनी मला एक मोठी गोष्ट शिकवली होती, ते म्हणाले होते की, ‘मोठा माणूस जरूर हो पण त्यापूर्वी एक चांगला माणूस होवून दाखव’. मला आनंद आहे की त्यांच्या या संस्कारानेच मला चांगला माणूस बनता आले. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला चांगले गुरुजनही लाभले ज्यांनी आज मी जे काही झालो त्या मला घडविले आहे.”

गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याची वृत्ती त्यांना वडीलांकडून वारश्याने मिळाली आहे. त्यांनी लहानपणापासून पाहिले की त्यांचे वडील परोपकारी आणि दयाळू होते. ते म्हणतात की , “ मी खूप लोक पाहीले मात्र त्यांच्या सारखा मोठ्या मनाचा माणूस नाही पाहिला. एकदा त्याची नोकरी गेली होती मात्र त्यांनी घरात ही गोष्ट कळू न देता जाणवू दिले नाही की त्यांना काय त्रास होत असेल. त्यावेळी माझ्या काकांची जबाबदारी देखील त्यांच्यावरच होती, मात्र त्यांनी हस-या चेह-याने सा-या जबाबदा-या पूर्ण केल्या.” आईला तर राकेश त्याग मुर्ती मानतात, आणि म्हणतात की तिच्या सारखा प्रेमळ मनाचा माणूस कुणीच नसेल.

राकेश यांची आणखी खास गोष्ट अशी की त्यांच्या साहित्यिक मामांपासूनही ते फार प्रभावित आहेत. त्यांना आधुनिक भारताच्या साहित्यात मोठे स्थान आहे. उदय प्रताप सिंह यांना गेल्या काही वर्षापासून त्याच्या कवी संमेलनातून नावाजले जाते. मामांच्या प्रभावातून त्यांनी देखील पाच वर्षाचे असता पासून कवी संमेलनाला जाण्यास सुरूवात केली. देशातील बहुतांश कवींच्या रचनांचे प्रभाव बाल वयातच त्यांच्या मनावर झाले आहेत. मग त्यांनी देखील कविता करण्यास सुरूवात केली. मात्र अभ्यासामुळे नंतर ते थांबले. आताही संधी मिळाली की ते स्वत:ला साहित्याशी जोडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सिने संगीतही आवडते.

दिल के झरोखे में तुझको बिठाकर

यादों को तेरी मैं दुल्हन बनाकर

रखूँगा मैं दिल के पास, मत हो मेरी जाँ उदास

‘ब्रम्हचारी’ या सिनेमाचे हे गाणे त्यांना सर्वाधिक भावते. याच गाण्याच्या माध्यमातून ते लोकांना हृदयाची काळजी कशी घ्यावी ते देखील सांगतात. ते म्हणतात की, “जर पाच बाबींना हृदयाच्या खिडकीत बसवून ठेवले तर आणि त्यानुसार काम केले तर हृदयाच्या विकारापासून दूर राहता येते. पहिले आवश्यक काम - रोज थोडा तरी व्यायाम करणे. दुसरे - खाता पिताना संयम राखणे. तिसरे - मिठाचा कमीत कमी वापर करणे. चवथे – तंबाखू आणि दारू पासून दूर राहणे. आणि पाचवे – जीवनात तणावा पासून दूर राहणे आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे.

राकेश यांच्या यशामागे आणखी महत्वाचे एक कारण आहे ते म्हणजे ते वेळेचा योग्य वापर करतात. ते वेळ वाया घालविणे म्हणजे सर्वात मोठा अपराध मानतात. ते म्हणतात, “ लहानपणापासून मी वेळेचा सदुपयोग केला आहे, अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि खेळाच्या वेळी खेळ खेळलो एक मिनिट देखील व्यर्थ घालविला नाही”. राकेश यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते वेळेला आजही सर्वात बलवान समजतात. त्यांच्या जीवनाचा एकच सिध्दांत आहे ज्यावर ते नेहमी चालत राहिले आहेत, जो ते एका वाक्यात असा सांगतात --–Life is not a problem to be solved, It is a mystery to be lived. ( आयुष्य जगणे म्हणजे एखादी समस्या नाही जिचे निराकरण केले जाईल, तर आयुष्य रहस्याप्रमाणे जगले पाहिजे.)