देशातील पहिले डिजिटल व्हिलेज म्हणून 'हरिसाल' या गावाची निवड
देशातील पहिले डिजिटल व्हिलेज म्हणून हरिसाल या गावाची निवड करण्यात आली आहे. त्यादृष्टिने हरिसाल येथे बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत महा-ई-सेवा सुरु करण्यात आली आहे. देशभरात कॅशलेस व्यवहाराचे आवाहन होत असतांना हरिसाल सारख्या दुर्गम आणि अतिदुर्गम भागात जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन पॉस सेवा सुरु केली ही बाब अतिशय महत्वाची आहे. पॉस सेवेअंतर्गत बँकेकडून व्यापाऱ्यांना छोट्या पीओएस (पॉईंट ऑफ सर्व्हिस मशिन) पुरविण्यात आल्या आहेत. याद्वारे ग्राहकांना आपल्या आधार कार्ड किंवा एटिएम मशिनद्वारे पैशाचा भरणा करता येतो. न्यु मिलन ॲग्रो आणि ब्रँड किराणा स्टोअर्स च्या चालकांना पीओएस मशिन वितरीत करण्यात आली.
राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी हरिसाल डिजिटल व्हिलेज संदर्भात झालेल्या प्रगतीची माहिती घेतली, डिजिटल व्हिलेज समिती सदस्यांशी चर्चा केली. पेटीएम कार्यपध्दतीची माहिती घेतली प्रात्यक्षिक दाखवतांना स्मार्ट फोन धारकांनी आपल्या मोबाईलवर पेटीएम ॲप डाऊनलोड करावयाचे आहे. त्यानंतर बारकोड स्कॅन करुन व्यवहाराचे पैसे आपल्या खात्यातून वजा होतात. यासाठी आपल्या मोबाईलवर पेटीएम अकाऊंट असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत रोकड रहित अर्थव्यवस्था करण्याच्या दृष्टिने जिल्हा प्रशासनाने सुरु केलेला हा उपक्रम अत्यंत स्तूत्य असून नजिकच्या काळात मेळघाटातील बहुतांश गावात डिजिटल पेमेंट शक्य होणार आहे. या कार्यपध्दतीत शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थीच्या खात्यात पारदर्शक पध्दतीने निधी जमा होणार आहे.