Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
ADVERTISEMENT
Advertise with us

. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला!

२९ सप्टेंबरला मुंबईत एल्फिन्स्टन परळ रेल्वे स्थानकावर दुर्घटना झाली, तेथील प्रसंगावर एका सु-हुदाने समाज माध्यमातून प्रसारीत केलेला हा संदेश. . . जीव हेलावून टाकणारा!

. . . . . आणि एक अभागी 'वसईकर' पासवाला!

Wednesday October 04, 2017 , 5 min Read

‘शुक्रवारी सकाळी ट्वीटरवर एल्फिन्स्टन व परळला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरीत ३ जण मृत्युमुखी आणि १५ जण जखमी झाल्याचे कळले. अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्नात असतानाच जॉन दिब्रिटो (मामा) ह्यांनी फोन करून आलेक्स कोरिया हे देखील जखमी झाल्याचे व काहीतरी वाईट घडल्याचे सूचित केले. मग क्षणाचाही विलंब न लावता माझे सहकारी रॉबिन रॉड्रीग्ज सोबत KEM हॉस्पिटलला रवाना झालो.

साधारणत: १२.३०च्या सुमारास केईएमला पोहोचलो. त्याच दरम्यान मॉनिश देखील तिथे पोहोचला. आपतकालीन विभागाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. असंख्य टीव्ही पत्रकार आणि दुर्घटनेमध्ये जखमी आणि बळी गेलेल्या प्रवाशांचे नातलग ह्यांची मोठी गर्दी जमली होती. मंत्री, खासदार विद्यमान आमदार, माजी आमदार अशी अनेक मंडळी सतत आत जात येत होती परंतु नातेवाईकांना प्रवेश मनाई होती. दुःखी, हताश आणि हतबल नातेवाईक कुठे जमिनीवर बसून तर कुणाच्या खांद्यावर अश्रूंना वाट करून देत होते. मृत व्यक्तींच्या कुटुंबातील माणसं जोराने टाहो फोडत आपत्कालीन विभागाकडे धाव घेत होती. कुणाला सावरावं आणि कुणाला खांदा द्यावा हेच कळेनासं झालं होतं. मी कसाबसा आत शिरलो पुढे डाव्या बाजूला पडद्याचा आडोसा केला होता आणि पलीकडे प्रवेश नव्हता. पडद्या आडून तेथे डोकावलो आणि एक वेळ मी पूर्णपणे सुन्न झालो. पडद्याच्या पलीकडे जमिनीवर होते निपचित पडलेले २२ मृतदेह! एकाही मृतदेहावर नजर खिळतच नव्हती. काल नवरात्री सणाचा जांभळा रंग, आणि दोन अभागी महिला जांभळ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या होत्या. कित्येक कुटुंबातील कर्ते पुरुष गतप्राण झाले होते तर कुठे तान्ह्या मुलाला सोडून आई दूर निघून गेली होती. कुणाचा जुन्या ऑफिस मधला शेवटचा दिवस खरोखर शेवटचा ठरला तर दसऱ्या निमित्ते फुलं आणण्यासाठी आलेल्या दोन महिला घरी परतण्या अगोदरच देवाघरी गेल्या होत्या. मृतदेहाची ओळख आणि नोंदणीचा सोपस्कार सुरू होता. तसाच बाहेर आलो. मॉनिश अंतकरणाने म्हणाला की, मी नुकताच आत जाऊन आलो आणि त्या २२ जणांमध्ये दुर्दैवाने पप्पा देखील आहेत. आम्ही पुन्हा आत गेलो आणि खात्री केली. प्रत्येक मृत व्यक्तीच्या कपाळावर नंबर देण्यात आला होता जेणेकरून पुढील सोपस्कार उरकताना सोयीचं जावं. मयत आलेक्स कोरिया ह्यांच्या कपाळावर १२ नंबर लिहिण्यात आला होता.

 

image


आलेक्स सिल्व्हेस्टर कोरिया, वय ६१ हे विरार पश्चिम येथील शेतकरी आणि फुलाचे व्यापारी! स्थानिक भाषेत ह्या व्यापाऱ्यांना 'पासवाले' म्हणतात. मॉनिश त्यांचा थोरला मुलगा. धाकला मॅक्सवीन. मागील ३५ वर्षे ते अव्याहतपणे मुंबईत फुलांचा व्यवसाय करतात. आज फुलं विकून परतीच्या प्रवासाला सुरुवात करीत असतानाच त्यांच्या आयुष्याचा दारुण अंत झाला.

प्रशासनाकडून आम्हाला सांगण्यात आलं की पंचनामा आटोपला की मग शवविच्छेदन (पोस्ट मॉर्टेम) करण्यासाठी नेण्यात येईल आणि मग तुम्ही मृतदेह घेऊन जाउ शकता. दरम्यान कुणीही मार्गदर्शन करत नसल्याने आम्ही आत प्रवेश केला आणि विचारणा केली. पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद देत एका पोलीस अधिकाऱ्याला १२ नंबरची केस देऊ केली. त्याच्याकडे ६-७ पानांचा संच देण्यात आला. मुंबई पोलिसांनी जवळपासच्या पोलिस स्टेशन वरून जबाब आणि माहिती नोंदवण्यासाठी २०-२२ PSI (POLICE SUB INSTECTOR) बोलावले होते. जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया लवकर पूर्ण होईल. मयत आलेक्स कोरिया आणि त्यांचा मुलगा मॉनिश ह्यांच्या विषयी पूर्ण माहितीची त्यांनी त्या अहवालात नोंद केली.

एक एक नंबर पुकारून स्ट्रेचर वरून मृतदेह शवविच्छेदनाला नेले जात होते. १२ नंबर पुकारला आणि पोलीस अधिकारी आणि नातेवाईक ह्यांना सोबत घेऊन दोन वॉर्डबॉय स्ट्रेचर घेऊन शवविच्छेदन विभागाकडे निघाले. त्या विभागाची क्षमता कमी असल्याने बाहेरच थांबावे लागले. ह्या घटकेपर्यत त्यांचा मुलगा, भाऊ, नातेवाईक आणि आपल्या परिसरातील अनेकजण हजर झाले होते. मला काही मदत करत येईल का ह्याच उदात्त हेतूने ही सहृदय मंडळी आली होती. आता पुढील कामात मदतीचे हात आवश्यक होते. जोसेफ लोबो, विलास डिसुझा, स्टेनीस्लोस लोबो, प्रशांत रॉड्रीग्ज आणि रॉबिन लोपीस ह्यांनी मोठे प्रयत्न करून आत प्रवेश मिळवला. दरम्यान पोलीस अधिकाऱ्याने मॉनिशला आत घेतले आणि त्याच्या समक्ष मृताच्या संपूर्ण शरीराची तपासणी केली. शरीरावर असलेल्या जखमा,उठलेले व्रण आणि दुखापत ह्यांची नोंद तो अधिकारी करीत होता. आत मधील दृश्य व्यक्त न करता येण्यासारखे होते.

नोंद आणि जबाबाचा भाग पूर्ण झाल्यावर मॉनिश बाहेर आला. शवविच्छेदन होईपर्यत बराच काळ लोटला. शेवटी त्यांनी बाहेर येऊन १२नंबरचे शवविच्छेदन पूर्ण झाल्याचे सांगितले. त्या नंतर पोलीस अधिकाऱ्याने हॉस्पिटलचे शवविच्छेदनाचे अहवाल (अपूर्ण) घेऊन त्यावर मॉनिशची सही घेतली.

मधल्या काळात मोनिशने सांगितले की पाप्पाचे काही सामान जे पोलिसांनी गोळा केले होते ते ताब्यात घेण्यास त्यांनी बोलावले आहे. तेथे आपत्कालीन विभागात अजूनही सहा मृतदेह होते पैकी ३ मृतदेहांची ओळख न पटल्याने अज्ञात म्हणून त्याची पुढील प्रक्रिया सुरू केली. तेथेच एक बाजूला दोन बॉक्स मध्ये २२ जणांचे जे काही सामान मिळाले होते ते एका पिशवीमध्ये ठेवून त्यावर नंबर लिहिला होता. १२ नंबरच्या पिशवीमध्ये मोबाइल फोन, कमरेचा पट्टा आणि एका कागदी पाकिटात पैसे होते. तेथील पोलीस अधिकाऱ्याने हे समान परत करताना नोंद करण्यास सांगितले. भिजलेल्या अवस्थेतील चुरगळलेल्या नोटा गिऱ्हाईकांनी जशा दिल्या असतील तशाच कोंबल्या होत्या. त्या अधिकाऱ्याने आपल्या जवळील मोबाईल कॅमेऱ्याची शूटिंग सुरू केली. मग १०,२०,५०,१००,५०० आणि २०००च्या नोटांचे वर्गीकरण करून त्या मोजल्या त्यांची बेरीज करून त्या जबाबवर सही घेतली आणि सर्व सामान हवाली केले.

तेथे परत जाईपर्यंत स्टॅनी दिब्रिटो,ग्रेग डायस, ऑस्टिन कोरिया हे देखील मदतीला आत आले होते.

शेवटी ४.१५ वाजेपर्यत हॉस्पिटल आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला मृतदेह घेऊन जाण्यास परवानगी दिली. परंतु हॉस्पिटलने देऊ केलेल्या फॉर्मवर आडनावाची स्पेलीग चुकल्याने पुन्हा सर्व फॉर्म परत भरून सही आणि शिक्का घ्यावा लागला. दरम्यान मृतदेह घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी मिळविण्यासाठी प्रशांत, सायमन ब्रिटो, स्टॅनी ब्रिटो, ग्रेग डायस ही मंडळी कस्तुरबा हॉस्पिटलला रवाना झाली. संध्याकाळी ५.३५ वाजता वसईतील एका दुर्दैवी फुलवल्याचा निपचित देह सोबत घेऊन आम्ही हॉस्पिटलचा निरोप घेतला.


आपत्कालीन प्रसंगी घ्यावयाची काळजी, उपाययोजना आणि आम्ही प्रत्यक्षात अनुभवलेली परिस्थिती ह्यावरून खूप काही शिकण्यासारखे आहे.

*आपल्याकडे अजूनही DISASTER MANAGMENT पूर्णपणे कार्यान्वित होणे गरजेचे आहे.एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपत्कालीन वेळेत एक संपूर्ण व्यवस्था असावी की जी पोलीस प्रशासन, हॉस्पिटल आणि जमलेले लोक ह्यांच्याशी समन्वय साधू शकतील.

*महाराष्ट्रातील आणि देशातील विविध पक्षांची नेतेमंडळी भेट देण्यास येत होते. हे खरंच गरजेचं आहे का? पोलीस आणि हॉस्पिटल प्रशासन झोकून कामात व्यस्त असताना ह्या राजकारण्यांनी तिथे भेट देण्याने सर्वच कामास विलंब लागत होता.

*अशा ठिकाणी जी व्यक्ती प्रत्यक्ष कामात व्यस्त असते तिला वारंवार येणाऱ्या फोन कॉल्समुळे कामात विलंब होत असतो.

* आपल्या कडे झोकून देणाऱ्या आणि तातडीने हजर होऊ शकणाऱ्या तरुणांची एक टीम असणे आवश्यक आहे. मुंबई आणि वसईतील आपतकालीन समयी ते घटनास्थळी मदतीला जाऊ शकतील. ज्या कुणाला अशा कामात आवड आहे त्यांनी कृपया संपर्क साधावा.

* अपघात समयी मृत कुटुंबातील व्यक्तींना जोवर कळत नाही आणि कुटुंबियांकडून मयताचा अधिकृत संदेश येत नाही तोवर आपण व्हाट्सएप वर फोटो आणि चर्चा करतो ती थांबवता येईल का?

रॉजर रॉड्रीग्ज

(समाज माध्यमातून साभार)