स्वतःचा लघु उद्योग व्यवसाय वयाच्या चौपन्नाव्या वर्षी थांबवण्याचा निर्णय घेतला आणि ठरवलं आता सिरॅमिक पॉटरीमध्ये ( कुंभार व्यवसायात) काम करायचं. शालन डेरे, एक सिरॅमिक पॉटर. सिरॅमिक आणि पॉटरीमधल्या कोणत्याही शिक्षणाचा गंध नसताना आणि ज्या वयात लोकं निवृत्तीचं नियोजन करतात त्या वयात ही सेकंड इनिंग खेळण्याचा विचार त्यांच्या मनात आला कसा हा प्रश्न आपल्या मनात आल्यावाचून रहात नाही. पहिल्यापासूनच माझा उत्साह दांडगा आहे. सतत काहीतरी नवं करायचं हा माझा पहिल्यापासूनचा स्वभाव. आम्हा भावंडांना कलेतील शिक्षण नाही पण चित्रकलेची आवड होती. मला बागकामाची आवड आहे. झाडांचे वेगवेगळे शोज् मी करायचे. त्यासाठी वेगवेगळ्या मातीच्या, सिरॅमिकच्या कुंड्या लागायच्या. त्या निमित्तानं या कलेची तोंडओळख होती. पण कधी त्या प्रांतात शिरले नाही.
एकदा एका प्रदर्शनामध्ये ‘पॉटरीचा क्लास आहे’ अशी पाटी लावलेली दिसली आणि सहज जायला सुरवात केली. १९९२-९३ मधली गोष्ट. मी माझा व्यवसाय आणि घर सांभाळून जमेल तसं क्लासला जायचे. त्या फिरत्या चाकावरच्या मातीचं वेड असं काही मनात भिनलं की, मला आठवतयं... क्लासेस संपण्याआधीच मी माझं व्हिल ऑर्डर केलं होतं. मग रोज रात्री घरातली कामं आवरुन मी त्या व्हिलवर जमतील तशा वेड्यावाकड्या वस्तू बनवायचे. सकाळी उठून घरातल्या सगळ्यांना त्या दाखवायच्या असं सगळं चालू होतं. मग धारावीतल्या कुंभारवाड्यात सगळं काम घेऊन जायचं आणि भाजून आणायचं असा प्रकार एक दीड वर्ष चालला. मग हळूहळू ओळखी वाढत गेल्या. कर्जतला जाताना वाटेत चौक म्हणून एक जागा आहे. तिथे सिरॅमिकचा व्यवसाय चालतो. त्यांची स्वतःची मोठ्ठी भट्टी आहे. शनिवार रविवार तिथे गाडी चालवत जायचं...आधीची भाजलेली भांडी घेऊन यायची आणि नवी भाजायला भट्टीत ठेवायची अशी धावपळ दोन वर्ष चालू होती, तिथेचं या मातीच्या वस्तू, भांडी यांना ग्लेझिंग कसं करायचं हे शिकले. इलेक्ट्रीक चाकावरती मातीला आकार देऊन भांडं बनवायचं, त्यानंतर ते भट्टीत भाजायचं...त्याला फायरिंग म्हणतात. त्यातही बिस्किट फायरिंग आणि ग्लेज फायरिंग असे दोन प्रकार असतात. वेगवेगळे रंग वापरावे लागतात. आपण वापरलेल्या रंगांचं फायरिंगनंतर आऊटपूट कसं दिसेल हे सांगाता येतं नाही. भट्टीचं दार उघडल्यानंतरचं आर्टिस्टला कळतं. भट्टीत किती डिग्रीवर किती वेळ एखादा पॉट ठेवायचा हे सतत केलेल्या प्रयोगांमधून कळत जातो. तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळण्यासाठी अथक प्रय़त्न करावे लागतात. मी देखील अनेक चुकांमधून शिकत गेले. अजुनही शिकतेय. किल म्हणजे भट्टी. ही किल विकत घेतल्यानंतर सुरवातीला संपूर्ण दिवस मी त्यात माझी भांडी भाजत लावली होती. त्याच्यावरचा तापमान दाखवणारा आकडा काही केल्या वाढत नव्हता. मला वाटलं अजून वेळ आहे...होईल भाजून... म्हणून मी वाट पहात राहिले, शेवटी त्या किलमधून धूर यायला लागला. मी घाबरुन बटण बंद केलं. दोन दिवसांनी किल थंड झाल्यावर उघडली तर माझे पॉटस् तर जळून खाक झाले होतेच पण संपूर्ण भट्टीचं इंटिरिअर जळून गेलं होतं. अशा छोट्या छोट्या अपघातांतूनचं मी शिकत गेले. शालन हसत हसत सांगतात.
या आर्टमध्ये खूप शिकण्यासारखं आहे. एकाच पॉटचं इतक्या विविध पद्धतींनी फायरींग करता येतं हे शिकण्यात, समजण्यात इतकी वर्ष जातात....आर्टिस्ट या फायरिंगमध्ये प्रयोग करण्यात संपूर्ण हयात घालवतात, मला तर आणखी कित्ती शिकायचं बाकी आहे. गरगर फिरणारं चाक, मातीचा हाताला होणारा स्पर्श, पाणी आणि माती एकमेकांत मिसळून जातांना पहाणं, हातांनी ते अनुभवणं हे सगळं विलक्षण आहे. सृजनचा आनंद...याहून अधिक काय हवं...नवनिर्मिती हीच तर साऱ्या कलांची प्रेरणा आणि उर्जा आहे. हाच आनंद मलाही जगण्याची उर्जा देतो.