Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
ADVERTISEMENT
Advertise with us

'जलदिंडी' करतेय नदी संवर्धनाचा जागर

'जलदिंडी' करतेय नदी संवर्धनाचा जागर

Sunday May 22, 2016 , 4 min Read

शहरीकरण वाढतंय, शिवाय औद्योगिकीकरणही वाढतंय. अशावेळी पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या नद्या प्रदुषणग्रस्त होत आहेत. याचा परिणाम माणसं, जनावरं आणि शेतीवरही झाला झाला आहे. हे मानव निर्मित संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी माणसानेच प्रयत्न केला पाहिजे. नद्यांना स्वच्छ करण्याचा प्रयत्न जलदिंडी प्रतिष्ठानतर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून केला जातोय. जलदिंडीने नद्यांची स्वच्छतेचा वसा घेतला आहे. शिवाय आरोग्य आणि लोकशिक्षणामध्ये जलदिंडी काम करत आहे. आळंदी ते पंढरपूर असा जलदिंडीचा प्रवास गेले १५ वर्षे अविरत सुरु आहे. या माध्यामातून शंभर पेक्षाही अधिक गावांमधून नदी संवर्धनाचा संदेश जलदिंडीतर्फे दिला जात आहे. 

image


या जलदिंडीची सुरुवात करण्यात अग्रणी असलेले डॉ. विश्वास येवले यांनी सांगितलं,” जलंदिंडी ही फक्त मोहिम राहिलेली नाही, तर आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग बनली आहे. गेल्या पंधरा वर्षांत जलदिंडीचा प्रवास इथल्या सांस्कृतिक प्रवाहाचा भाग बनला आहे आणि आम्ही नदी संवर्धनांतून लोकांमध्ये जागृती करु शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आता पंधरा वर्ष झालीयत. म्हणजेच ही दिंडी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातेय. जलसंवर्धनाचा वसा आम्ही पुढच्या पिढीला देतोय याचा आम्हाला अभिमान आहे.” 

image


आपलं जीवन सुकर करण्याच्या नादात मानवानं निसर्गांची मोठी हानी केलीय. वाढते औद्योगिकीकरण आणि रोज एक नवीन शहर तयार होत असताना विकासाच्या या प्रवासात नद्यांकडे दुर्लक्ष केलं. ज्या नद्या शुध्द पाण्याचा पुरवठा करतात. ज्या जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जातात. या नद्या विकासाच्या या स्पर्धेत लुप्त होत गेल्या. किंवा त्या इतक्या प्रदूषित झाल्या की त्यांचं पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही. पिण्याचं पाणी प्रदुषित होत राहिलं आणि याचा परिणाम मानवी आरोग्याबरोबरच, जनावरांवर आणि शेतीवर झाला. यामुळे स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या डॉ. विश्वास येवले यांच्या पुढाकारानं जलदिंडी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. वर्षे होतं २००२. जलदिंडीचं ब्रीद वाक्य ठरलं ‘पाण्याची मैत्री, पाण्यावर भक्ती’. 

image


पाणीटंचाई आणि नदी प्रदूषणाबाबत शहरं तसंच ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंद्रायणी, भीमा नदीतून आळंदी ते पंढरपूर अशी जलदिंडी काढण्यात येते. स्वास्थ्याचा संदेश देणारी ही दिंडी १०० गावातून जाते. यामार्फत ग्रामविकास आणि स्वच्छतेचा जागर गेल्या १५ वर्षांपासून सुरु झालेला आहे. जलदिंडीबरोबरीने असलेले १५ कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून जलसंवर्धन, आरोग्य, वृक्षारोपण, पाण्याचे महत्त्व, शेतीमधील नवीन संशोधनाबाबत माहिती देतात. या उपक्रमासाठी दर वर्षी आळंदी परिसरातील वारकरी शिक्षण संस्थांचे सहकार्य मिळते.. काही कीर्तनकार भारूडाच्या माध्यमातून पर्यावरण, शिक्षणाचा प्रसार करतात.

image


“ आता या जलदिंडीला सांस्कृतिक स्वरुप आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी या जलदिंडीला सुरुवात होते. त्याद्वारे नदीचं पात्र स्वच्छ करण्याचं काम सुरु होतं. प्रत्यक्षात ही जलदिंडी नऊ नद्यांच्या किनारी वसलेल्या प्रत्येक गावात जाऊन पाणवठा स्वच्छ ठेवण्यासाठी, तसंच पावसापासून मिळणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करण्याचा संदेश देते. लोकांनी या उपक्रमाला आपलंसं केलंय. आपल्याकडे वारीची शेकडो वर्षांची पंरपरा आहे. तशीच ही जलदिंडीची परंपरा सुरु झाली आहे.” डॉक्टर येवले सांगत होते. 

image


ते पुढे म्हणाले, “ नदीचे पाणी जेवढे स्वच्छ तेवढे त्या प्रदेशातल्या लोकांचे आरोग्य चांगले असते. तिथली शेती समृध्द होते. प्रवाह थांबला की नदी मृत होत जाते. तिथली संस्कृतीही संपते असे दाखले आपल्याकडे आहेत. जिथून नदी उगम पावते तिथून काही किलोमीटरपर्यंत पाणी स्वच्छ असते. पण नंतर पुढे त्यात सांडपाणी मिसळते, कचरा आणि औद्योगिक रसायनेमिश्रित पाण्याने नदीचे स्वरुप बदलून जाते आणि पाणी पिण्यायोग्य राहत नाही. यामुळेच नदीच्या संवर्धनासाठीच जलदिंडीच्या माध्यमातून हा जागर करण्यात येत आहे. पर्यावरणप्रेमी संस्था, कॉलेजेस आणि शाळा या माध्यमातून एकत्र येऊन काम करतात.” 

image


फक्त नदीचं पात्र स्वच्छ न करता नदीच्या काठचा आणि आसपासचा परिसर स्वच्छ करण्यावर जलदिडींचा प्रयत्न असतो. जेणेकरुन सर्वांगिण स्वच्छता होईल. नदीकाठच्या गावांमध्ये जाऊन तिथं लोकांना नदी स्वच्छ कशी ठेवता येईल याबद्दल प्रबोधन केलं जातं. पर्यावरणासंदर्भात जनजागृती केली जाते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात ही जलदिंडी काढण्यात येते. आळंदी ते पंढरपूर असा इंद्रायणी, भीमा नदीतून बारा दिवसांचा साडे चारशे किलोमीटरचा प्रवास केला जातो. या दरम्यान १२ गावांमध्ये मुक्काम केला जातो. या दिवसात नदीकाठच्या गावांमध्ये पथनाट्य, कीर्तन, भारूड, शालेय विद्यार्थ्यांसाठी माहिती पट, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण असे उपक्रम राबविले जातात. डॉक्टर येवले सांगतात, “प्रत्येक नदीत जलदिंडी शक्य आहे. प्रत्येक नदी आणि ओढ्याला पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतो.”  

image


दर वर्षी आळंदी येथून निघणाऱ्या जलदिंडीच्या माध्यमातून जलमैत्री उपक्रम राबविला जातो. शिवाय जलस्वास्थ्य यात्रेतून आरोग्याचा जागर, जलदिंडी जाणाऱ्या नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांच्याबरोबरीने शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य, स्वच्छतेचे महत्त्व कळण्यासाठी शाळांमध्ये उपक्रम राबविले जातात. संस्था दरवर्षी विविध गावांमध्ये ५०० रोपांचे वाटप करते. या संकल्पनेतून काही गावांमध्ये प्रत्येक घरासमोर एक नारळाचे रोप चांगल्या प्रकारे रूजले आहे. काही गावांनी पडीक जमिनीवर चांगल्या प्रकारे वनीकरण केले आहे.

 

image


पुढच्या पिढीकडे जलदिंडीचा वसा:

जलदिंडी प्रतिष्ठानतर्फे जलसाक्षरता विषयक अभ्यासक्रम हाती घेतले जातायत. त्यानुसार आठवी इयत्तेच्या कार्यानुभव विषयात जलदिंडी उपक्रमाचा समावेश करण्यात आलाय. इकोटूरच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना पवना नदीच्या उगमापर्यंत नेले जाते. नौका विहार केला जातो. त्यानंतर उगमापासून नदी जसजशी पुढे जाते तसतसे त्यात होणारे बदल आणि प्रदुषण दाखवण्यात येते. ते टाळण्यासाठी काय करता येईल याचा क्लासच या इकोटूरमध्ये घेण्यात येतो. या टूरला येणारा प्रत्येक विद्यार्थी नंदी संवर्धनाचा विचार घेऊनच घरी येतो. आतापर्यंत सुमारे २०० शाळांमधल्या मुलांना या इको टूरमध्ये सहभागी करण्यात आलंय.

डॉक्टर येवले यांनी सांगितलं. “आता या जलदिंडीची व्याप्ती परदेशात पोचली आहे. जपानमधल्या ओसाका शहरातल्या बिवा तलावाच्या स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी जलदिंडी उपक्रम हा रोल मॉडेल म्हणून तिथल्या लोकांसमोर मांडण्यात आलाय. या उपक्रमाबाबत विविध मासिंकांमध्ये दखल घेण्यात आलीय. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

अमेरिकेतून शिक्षण घेऊनही देशातल्या शेतक-यांना शेतीमधल्या आधुनिक प्रयोगांचे धडे देणारे, “चंद्रशेखर भडसावळे” !

एका संगणक अभियंत्याने स्व:बळावर पर्यटनासाठी विकसित केले 'ईको टूरीझम'

भुकेल्या पोटासाठी रोटी बँक...