सोन्याच्या झगमगाटापुढे भलेभले नमले. सीतेला कांचनमृगाचा मोह पडला आणि संपूर्ण रामायण घडले. तिथे सामान्यांची काय कथा...सोनं हा भारतीयांसाठी कायमच जिव्हाळ्याचा विषय राहिलाय. मात्र या सोन्याच्या दुनियेत चांदीवर मोह जडला आणि आज हीच चांदी तिच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालीय.‘मोहा’ हा चांदीत दागिने घडवणारा ब्रँड आणि त्याची निर्माती तरुण उद्योजक गीतांजली गोंधळे.
दागिन्यांची आवड तशी प्रत्येक स्त्रीला उपजत असतेच. त्यात सोन्यावर जरा जास्तच जीव असतो. पण गीतांजलीला चांदीच्या दागिन्यांची आवड लहानपणापासूनच. त्यातून कर्मशिअल आर्टचं शिक्षण असल्यानं दागिन्यांच्या आकारांमध्ये तिला जरा जास्तच इंटरेस्ट होता. पैसे साठवून मी चांदीचे दागिने करुन घ्यायचे. कधीकधी तर सोनारालाही मी अक्कल शिकवायचे. गीतांजली हसत हसत सांगते. तेव्हाच हळूहळू मनात विचार पक्का होत गेला की आपण आपल्या मनातले, वेगळ्या डिझाइन्सचे चांदीचे दागिने तयार करायचे. मग रिसर्च सुरु केला. या विषयातलं शास्त्रशुद्ध शिक्षण नव्हतं. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांना भेटले, आमचे एक नातेवाईक सोन्याचे व्यापारी होते. त्यांची पुष्कळ मदत झाली. चांदीचे दागिने घडवण्यासाठी पत्रा ओढणे, मोल्ड, पॉलिश अशा अनेक गोष्टी आणि त्यातले कारागीरही. सुरवातीला कानातले बनवले. अगदी थोडे. मग चार ते पाच महिन्यांचा रिसर्च आणि दागिने घडवण्याचं ट्रेनिंग असा प्रवास करत २ डिसेंबर २०१३ ला ‘मोहा’चा जन्म झाला. TISS मुळे नर्मदेच्या खोरं पाहिलं होतं. तिथली मोहाची झाडं, त्यांचं सौंदर्य या सगळ्याची नशा माझ्यावर होती. म्हणून नाव ठेवलं मोहा. आपल्याकडे सोन्याच्या दागिन्यांची परंपरा आहे. त्यामुळे दागिन्यांची नावं,त्यांचे प्रांतानुसार वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र सोन्याला मिळालेलं ग्लॅमर चांदीला नाही. चांदीचे दागिने महाराष्ट्र आणि देशभरातील अनेक आदिवासी जाती-जमातीत आजही वापरले जातात. त्यांची डिझाईन्स विलक्षण सुंदर आहेत. सातपुडा आणि राजस्थानमधील रावडी भागातील अनेक आदिवासींच्या भेटीगाठी घेऊन,त्यांचा अभ्यास करुन मी दागिन्यांची डिझाईन्स तयार केलीयेत. मला स्वतःला आदिवासी, त्यांचं जगणं, निर्सगाशी त्यांचं असलेलं नातं हे फार सुंदर वाटतं आणि हेच मी माझ्या दागिन्यांमधून दाखवण्याचा प्रय़त्न करते.
या क्षेत्रात गुंतवणूक आणि टेक्निकल नॉलेज लागतं. त्यामुळे मी जयपूरमधील कारागिरांना भेटले. अर्थात त्यांच्याकडून माहिती मिळवणं सोपं नव्हतं. त्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागले. एका बाईला ही सगळी माहिती द्यायची याचं त्या कारागिरांना दडपण यायचं.ते बोलायचे नाहीत. त्यांना खूप समजावून सांगत, कलाकलानं घेत हे सगळं ज्ञान मी मिऴवलयं. सतत वेगवेगळ्या लोकांना भेटणं, रिसर्च करणं अशी भ्रमंती चालूच असते. हे शिकणं वेगळं आहे. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसून काम करण्यापेक्षा या कारागिरांमध्ये बसून कामं करणं हे जास्त आनंद देणारं आहे. या सगळ्या मेहनतीतून जेव्हा फायनल प्रॉडक्ट हातात येतं, तेव्हा त्याचं सौंदर्य़, त्याचा हाताला होणारा स्पर्श, त्यामागची मेहनत हा सगळा सुखावून टाकणारा अनुभव असतो.
गीतांजलीच्या ठाण्याच्या स्टुडियोत चांदीचे हे विविध दागिने ठाण मांडून बसलेत. पण या दागिन्यांना अधिक मागणी आहे ती ऑनलाईन. आमच्या फेसबुक पेजवर तुम्हाला दागिने पहाता येतात आणि ऑनलाईन ऑर्डरही करता येतात. शिवाय मुंबई, कलकत्ता, बेंगलोर, गोवा अशा मोठ्या शहरातून भरणाऱ्या प्रदर्शनांनाही या दागिन्यांना चांगला प्रतिसाद आहे. सोन्याच्या दागिन्यांशी चांदीच्या दागिन्यांची तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला मिळणारे ग्राहक कमी असतील हे आधीपासूनच माहिती होतं. पण काही लोक आहेत...ज्यांना चांदी आवडते. त्यातल्या खुबी, डिझाईन्स त्यांना कळतात,भावतात. आमच्या फेसबुक पेजवर नोझ पिन्स, कानातले, हातातली कडी, नेकपीस तुम्हाला पहाता आणि विकत घेता येईल. बाकीही अनेक दागिन्यांच्या डिझाइनिंगवर काम चालू आहे. प्रत्येक प्रदर्शन वेगळं असतं. नवीन ग्राहक, नवी डिझाईन्स आणि नवे अनुभव...
एकेकाळी जमिनीचे राजे असलेले आदिवासी आज लुप्त होत चाललेत. त्यांचे दागिने म्हणजे साक्षात त्यांच्या परंपराच. म्हणूनच कालच्या आणि आजच्या माणसांमधला तुटलेला हा रेशीमधागा ‘मोहा’ पुन्हा गुंफतोय...नव्यानं.