Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
ADVERTISEMENT
Advertise with us

उद्योग,वाणिज्य-व्यापार क्षेत्रात डॉ बाबासाहेबांच्या संदेशाच्या मूर्त संकल्पनेसाठी झटणारे मिलिंद कांबळे यांची प्रेरणादायक कहाणी!

उद्योग,वाणिज्य-व्यापार क्षेत्रात डॉ बाबासाहेबांच्या संदेशाच्या मूर्त संकल्पनेसाठी झटणारे मिलिंद कांबळे यांची प्रेरणादायक कहाणी!

Thursday December 08, 2016 , 10 min Read

क्रांतीसूर्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील शोषित, पीडित मागास राहिलेल्या समाजातील घटकांना दिला. या संदेशाचे तंतोतंत पालन खूप दलित तरुणांनी केल्याचे पहायला मिळाले असेल मात्र मिलिंद कांबळे यांनी बाबासाहेबांचा हा संदेश शब्दश: आचरणात आणला आणि सर्व समाजात दलित म्हणजे सरकारच्या किंवा समाजाच्या कुबड्यांवर जगणारा समाज नसून त्याच्या प्रज्ञा, स्वाभिमान आणि मेहनतीच्या बळावर जगात अभिमानाने ओळख निर्माण करू शकेल असेल असा सक्षम समाज घटक आहे हे दाखवून दिले. उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात सरकारी अपेक्षांच्या पलिकडे भरारी घेत त्यांनी स्वत:चे क्षितीज विस्तारले आणि अनेकांच्या पंखांना त्याच मोकळ्या आकाशात भरारी घेण्याची प्रेरणा दिली आहे. ‘दलित चेंबर ऑफ कॉमर्सची’ स्थापना करून कांबळे यांनी दलित समाजाच्या तरुणांना उद्योग धंद्याच्या आणि व्यावसायिकतेच्या क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचे नवे दालन सुरू करून दिले आहे. त्यातून दर वर्षी हजारो तरूण स्वत:च्या उद्योग-व्यवसायात वळू लागले आहेत, त्यातून ते समाज, देश आणि त्यांच्या कुटूंबाला देखील नवा आशेचा मार्ग दाखविण्यात यश मिळवू लागले आहेत.

image


एका सर्वसाधारण दलित परिवारातून आलेल्या मिलिंद कांबळे यांच्या या क्षेत्रातील कामगिरीबाबत माहिती घेण्यासाठी यूअर स्टोरीने त्यांची भेट घेवून त्यांच्या या साहसी आणि अद्भूत जीवनप्रवासाच्या वाटचालीबाबत जाणून घेतले. केवळ स्वत:चा उद्योग व्यवसाय वाढविणे आणि पैसा कमविणे या पेक्षा स्वत: सोबत समाजाच्या इतर तरुणांनाही सोबत घेवून जाण्याचे जे काम त्यांनी केले आहे ते खरोखरच अव्दितीय आहे असेच म्हणावे लागेल. पुढील दहा वर्षात देशात समाजातील किमान शंभर अब्जोपतींना निर्माण करण्याचा ध्यास असलेल्या मिलिंद यांच्याबाबतीत वर्णन करायला शब्दच अपूरे पडतात. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते अहोरात्र झटतात. केवळ सरकारी आरक्षणाचा लाभ घेवून किंवा सवलतींचा फायदा घेवून नोक-या करणे या मानसिकतेमधून दलित तरुणांनी बाहेर पडून, समाजाच्या उद्योग- व्यवसाय क्षेत्रातही त्यांच्या बुध्दी आणि प्रज्ञा यांचा परिचय देता येतो याची असंख्य उदाहरणे त्यांनी तयार करून दाखवली आहेत.

image


एका शाळा शिक्षकांच्या मुलाने मोठे होताना देश आणि समाजाच्या अनेकांना मोठे करण्याच्या या कहाणीत प्रचंड मेहनत, प्रामाणिक कष्ट, संघर्ष आणि जिद्द यांचे दर्शन होते. त्यांच्या या कहाणीतून अनेकांना प्रेरणा घेता येते. दलित साधारण परिवारात १७ फेब्रूवारी १९६७ मध्ये जन्म झालेल्या मिलींद यांचे वडील प्रल्हाद भगवान कांबळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी करत होते. त्यांच्या मातोश्री यशोदा या गृहिणी होत्या, आई-वडिलांचे पहिलेच अपत्य असलेल्या मिलिंद यांना एक भाऊ आणि बहिण आहे. दलित समाजात जन्माला येवूनही कांबळे यांच्या सुदैवाने त्यांना जातीभेद आणि वर्ण तिरस्काराच्या अनुभवांना सामोरे जावे लागले नाही. याचे कारणही तसेच होते, ज्या चोबळी गावात त्यांचा जन्म झाला तेथे आर्य समाजाच्या शिकवणीचा प्रभाव होता. मोठ्या संख्येने लोक आर्य समाजाचे विचार मानत होते. त्यामुळेच शिक्षण, राष्ट्रीय भावना आणि विकासाच्या दिशेने जाण्यासाठी पोषक वातावरण त्यांच्या गावात होते. त्यामुळे जातीय भेदाभेद आणि इतर सामाजिक कुप्रथा यांच्यापासून त्यांचे गाव काहीसे अलिप्त असल्यासारखे होते. मिलिंद यांचे वडील प्रल्हाद यांच्या वडिलांचे निधन त्याच्या वयाच्या सातव्या वर्षीच झाले होते मात्र गावातील सवर्ण लोकांनीच त्यांना शिक्षण देण्यात पुढाकार घेतला होता. गावातील अण्णाराव पाटील यांनीच मिलिंद यांच्या वडिलांची देखभाल केली. आपल्या घरीच त्यांनी त्यांना शिक्षणासाठी ठेवले. माध्यमिक शाळेत शिकण्यासाठी जेंव्हा मिलिंद यांचे वडील प्रल्हाद यांनी तीन किलोमिटरवरील दुस-या गावात जायचे ठरविले त्यावेळी देखील सवर्ण समाजातील बाळासाहेब पाटील यांनी त्यांना मदत केली. त्यामुळे काही वाईट अनुभव न घेता त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि सरकारी नोकरी देखील मिळवली.

 जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची नोकरी मिळाल्याने मिलिंद यांच्या वडिलांचा सन्मान वाढला होता. त्यामुळे सर्व जाती जमातीचे विद्यार्थी त्यांच्या घरी शिकवणीसाठी येत असत, त्यांच्या शिकवण्याच्या वेगळ्या पध्दतीमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होते. त्यामुळे लोकप्रिय शिक्षकांच्या मुलांना देखील लोक सन्मानाने वागणूक देत असत. त्यामुळे आम्हाला कधी भेदाभेदाच्या वागणूकीचा सामना करावा लागला नाही असे मिलिंद म्हणतात. वडीलांच्या या आदर्शाला समोर ठेवून मिलिंद यांच्या मनात बालमनातच संस्कार होत होते की, माणसाने जर आपल्यातील गुणांचा विकास केला तर त्याला समाजात मान सन्मान मिळतोच. शिक्षणात चांगली गती असलेल्या मिलिंद यांना शिकून तंत्रअभियंता व्हायचे होते. मात्र एका प्रसंगाने त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता आले नाही आणि त्यांना नागरी अभियंता व्हावे लागले. मिलिंद यांचे नातेवाईक हनुमंत वाघमारे यांनी सिवील इंजिनिअर होवून सरकारी नोकरी मिळवली होती, त्यामुळे त्यांचे अनुकरण करण्याचे मिलिंद यांचे स्वप्न होते. त्याकाळी वाघमारे यांनी नवीन रॉयलएनफिल्ड ही मोटरबाईक घेतली होती, दलित समाजात त्याकाळात या मोटरबाईक असलेल्यांना प्रतिष्ठा होती, त्यांच्या या बाईकच्या ऐटीत गावात फिरण्याचा प्रभाव सर्वांवर होता तसा मिलिंद यांच्या वडिलांवर होता, त्यांनी आपल्या मुलाने देखील सिवील इंजिनअर व्हावे असा विचार पक्का केला त्या काळात सिवील इंजिनिअरला खूप मागणी होती. त्यानंतर वाघमारे यांच्या सल्ल्यानेच वडिलांनी मिलिंद यांना दहावी नंतर पॉलिटेक्निकला प्रवेश देण्याचे ठरविले त्यातून वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार होते. त्यामुळे १९८३मध्ये त्यांनी नांदेडमध्ये पॉलिटेक्निकला सिविल इंजिनअर होण्यासाठी प्रवेश घेतला.

image


त्याकाळात काही प्रसंग झाले त्यामुळे मिलिंद यांच्या मनावर खोल परिणाम झाला, पॉलिटेक्निकच्या प्रोजेक्ट वर्क करताना त्यांच्या पॉलिटेक्निकमध्ये माजी विद्यार्थी असलेले ठेकेदार विद्यार्थी साइट व्हिजीटला आले म्हणून त्याना भेटायला आले. ते ठेकेदार विलास बियानी यांचा थाटमाट पाहून मिलिंद प्रभावित झाले, महिंद्रा जीपमधून आलेल्या बियानी यांनी बांधकाम व्यवसायात चांगले नाव आणि खुप पैसा मिळवला होता. त्यावेळी मिलिंद यांनी विचार केला की चार वर्ष नोकरी केल्यावर त्यांचे नातेवाईक वाघमारे बाईक घेवू शकले होते, पण एकाच ठेक्यात फायदा कामवून बियाणी यानी महिंद्रा जीप विकत घेतली होती. विद्यार्थ्यांशी बोलताना बियाणी यांनी यशाचे काही मंत्रही विद्यार्थ्यांना दिले. त्यात ते म्हणाले होते की, दृढ निश्चय केला तरच यश मिळते. त्यांनी सांगितले की ठेकेदार होण्याआधी त्यांनी १८ महिने मँनेजर म्हणून साईटवर नोकरी केली आणि सारे बारकावे शिकून घेतले. बियाणी यांनी आणखी काही गोष्टी सांगितल्या त्यात ते म्हणाले होते की पुण्यात जमिन मुबलक असल्याने मुंबईनंतर येथेच मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यवसाय होणार आहे. मिलिंद यांनी ते लक्षात ठेवले, त्यामुळे वाघमारे यांच्या प्रमाणे सिवील इंजिनिअर व्हायचे आणि बियाणी यांच्याप्रमाणे व्यवसायात यायचे त्यांनी ठरवून टाकले होते. आपल्या घरच्यांचा विरोध असूनही सरकारी नोकरी करायची नाही असा मिलिंद यांनी निश्चय करण्याचे दुसरे एक कारण होते, उच्च शिक्षण घेत असताना ते दलित पँन्थर्सच्या चळवळीच्या संपर्कात आले होते, या आंदोलनात ते आकर्षित झाले. मात्र या आंदोलनात सहभागी सरकारी नोकरीत काम करणारे दलित लोक पोलिसांच्या भयाने थोडे बाजुलाच राहात असत कारण त्यांच्या नावे गुन्हा नोंदला तर नोकरी जाण्याचे भय होते ही गोष्ट मिलिंद यांना खटकत असे. जर आपणही सरकारी नोकर झालो तर आपले चळवळ करण्याचे स्वातंत्र्य हिरावले जाईल याची त्यांना जाणीव झाली आणि मग सरकारी नोकरी नकोच असा त्यांचा विचार बळावला. व्यवसाय केला तर जास्त पैसा मिळेल त्यातून सामाजिक कामेही करता येतील असा त्यांनी विचार केला. 

image


मिलिंद म्हणतात, “सरकारी नोकर हा नोकरच असतो तो आयएएस असेल तरीही त्याला बंधने येतात, व्यवसायात तसे नाही, सरकारी बाबूने बीएमडब्ल्य़ू घेतली तर त्याला चौकशीला सामोरे जावे लागते, व्यावसायिकाला नाही” मिलिंद यांच्यावर दलित पँथर्स प्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचाही प्रभाव होता. त्या आंदोलनात त्यांचे अनेक मित्र बनले. अभियांत्रिकीला आरक्षणाचा लाभ घेवून प्रवेश मिळाला मात्र वडिलांच्या उत्पन्नाच्या कारणामुळे शिष्यवृत्ती मिळाली नाही असे ते सांगतात. सरकारी नोकरीत संधी असून त्या करायला नकार दिल्याने वडील नाराज होते. मात्र मिलिंद यांनी स्वत:चा निर्णय घेतला होता. १९८७मध्ये मिलिंद यांना व्यवसाय करायचा तर भांडवल हवे आणि त्यांना वडिलांची मदत घ्यायची नव्हती, त्यांच्या स्वप्नासाठी त्यांनी घरच्यांना कल्पना दिली होती मात्र कुणी त्यांचे म्हणणे मान्य करत नव्हते. पण मुलाची इच्छा पाहून आईने त्यांना पाचशे रुपये दिले आणि ते घेवून ते पुण्यात आले. पुण्यात दलित पँथर्सचे कार्यकर्ता गायकवाड होते, ते रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होते, त्यांच्यासोबत मिलिंद राहू लागले. अनुभव घ्यावा आणि पुण्यात व्यवसाय शोधावा यासाठी त्यांनी नोकरी करायचे ठरविले. काही भांडवलही त्यांना जमा करायचे होते, म्हणून त्यांनी काही दिवस नोकरी करायचे ठरविले. गायकवाड यांच्यासोबत मिलिंद ज्या खोलीत राहात होते ते गायकवाड यांच्या ओळखीचे एक सीए होते. त्यांच्या ओळखीनेच त्यांना बांधकाम कंपनीत नोकरी मिळाली होती. म्हाळगी असोसिएटस नावाच्या या कंपनीतत त्यांना सातशे रुपये पगार ठरविण्यात आला. त्यांनतर काही दिवसांनी दुस-या एका कंपनीत ते काम करु लागले तेथे त्यांना १७५० रुपये पगार होता. या नोकरीत मिलिंद यांनी स्वत:साठी भाड्याचे घर घेतले. त्यानंतर जाण्यायेण्यासाठी सायकलही घेतली. या कंपनीच्या मालकांच्या कामाची पध्दत पसंत न आल्याने लवकरच त्यांनी ती नोकरी सोडली. त्यांनतर मिलिंद यांनी मंत्री हाऊसिंग कंपनीत नोकरीचा प्रयत्न केला, तेथे त्यांना जेंव्हा पूर्वीची नोकरी का सोडली याचे कारण समजले तेव्हा त्यांना तातडीने नोकरी मिळाली. पूर्वीच्या नोकरीत त्यांच्या मालकाच्या साईटपासून मिक्सिंग चा प्लांट शहराबाहेर होता, जे तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याने मिलिंद यांचा विरोध होता, त्यामुळे बांधकामांचा दर्जा निकृष्ट होत होता या कारणास्तव त्यांचे पूर्वीच्या मालकांशी पटले नाही आणि त्यांनी नोकरी सोडल्याचे समजल्यावर त्यांना त्यांच्या प्रामाणिक पणाच्या बळावर नवी नोकरी मिळाली होती. आता त्यांना ३७५० रुपये पगार होता. 

image


या कंपनीत काम सुरू असताना त्यांनी व्यवसाय करण्याच्या स्वप्नांना बळ देण्यास सुरुवात केली. त्यांनी कांबळे इंजिनिअर्स ऍण्ड कॉन्ट्रँक्टर्स नावाने कंपनी नोंदणीकृत केली आणि कामांचा शोध सुरू केला. सुटीच्या दिवशी कामे शोधता शोधता त्यांना एक काम मिळाले. त्यांना बृहन महाराष्ट्र महविद्यालयाच्या कुंपणाच्या भिंतीचे काम मिळाले होते. तो दिवस आपण कधीच विसरणार नाही असे ते सांगतात. हे काम लहानसे होते त्यामुळे फार कुणी ते करायला तयार नव्हते. मात्र हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. यावेळीही सवर्ण मित्रांनी मदत केली, जोशी आणि फडके यांच्याकडून पाच-पाच हजार रुपये त्यांनी उधार घेतले. त्यात स्वत:चे १५ हजार घातले आणि पहिले काम पूर्ण केले. त्यांच्या कामाने प्रभावित झालेल्या प्राध्यापकांनी त्यांना महर्षी कर्वे संस्थेच्या आणखी कामासाठी मदत केली. त्यावेळी त्यांनी नोकरी सोडली होती आणि पुरेसा अनुभवही त्यांच्याजवळ होता.

image


ठेकेदारीच्या जगात पाऊल ठेवताना दर्जाला त्यांनी प्राधान्य दिले त्यामुळे त्यांच्या कामाने ते ओळखले जावू लागले आणि नवीन कामे मिळू लागली. पहिल्याच वर्षी त्यांनी साडेसहा लाख कमाई केली. पण त्यांना त्यात समाधान नव्हते त्यांनी आणखी मोठी कामे मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला, त्या दरम्यान त्यांची भेट अनिलकुमार मिश्रा यांच्याशी झाली, त्यांच्याजवळ त्यांनी रेल्वेची कामे मिळवण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र रेल्वेच्या यादीत नसल्याने सहठेकेदारी करण्याचा पर्याय त्यांना होता. हा पर्याय त्यांना मान्य होता अनिलकुमार यांच्या मदतीने ते सहभागीदार झाले. एक दलित आणि एक ब्राम्हण अशा दोन भागीदारांची ही कंपनी वेगळीच होती. मिलिंद यांना मोठी कामे हवी होती तर मिश्रा यांचा राज्यसरकारच्या मोठ्या योजनेत जम बसवयाचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांना स्थानिक असलेल्या अशा भागिदारीची गरज होतीच. त्यामुळे दोघांनी एकमेकांना मदत करायचे ठरविले. मिश्रा यांचा स्वभावही त्यांना पसंत पडला आणि ते त्यांना पंडितजी म्हणू लागले. त्यातून त्यांच्या व्यावसायिक वृध्दी सोबतच प्रतिष्ठा आणि समृध्दी मध्येही वाढ झाली. व्यवसायात चांगला जम बसला होता त्यावेळी मिलींद यांनी सीमा यांच्यासोबत १९९५ मध्ये विवाह केला. त्यानंतर त्यांनी पुण्यात एक व्यावसायिक म्हणून अनेक कामे मिळवली आणि पूर्ण केली आणि स्वत:ला बिल्डर म्हणून प्रस्थापित केले.

या सा-या प्रवासांत त्यांना अनेक अडचणी होत्याच मात्र ते म्हणतात तसे “ मोठ्या कामात प्रश्नही मोठेच येणार, मात्र त्यावर मात करून जाताना मोठी हिंमत असली पाहिजे. काम प्रामाणिकपणे केले पाहिजे कुणाला धोका देता कामा नये हे मी शिकलो त्यातून यश मिळत गेले” ते सांगतात की कृष्णा खोरे महामंडळाच्या कामा दरम्यान त्यांना खूप त्रास झाला काही लोकांनी त्यांची लाचलुचपत विभागाला तक्रार केली. त्यातून छापे मारण्यात आले त्यातून स्थिती बिघडली. त्यामुळे अधिकारी त्यांच्यावर नाराज होते, त्यामुळे काम करणे अशक्य झाले होते. मात्र त्यांचे तत्व कायम होते अन्याय, अत्याचार किंवा भ्रष्टाचार त्यांना मान्य नव्हता त्यामुळे त्यांनी धीराने हा लढा दिला.

बारामतीला पाईपने पाणी देण्याचे काम आतापर्यंतचे सर्वात स्मरणीय काम होते असे ते सांगतात. २००३मध्ये हे काम करण्यात आले, उपसा सिंचनाच्या या योजनेचे काम आव्हानात्मक होते असे ते सांगतात. हा भाग देशाचे माजी कृषीमंत्री आणि मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कार्यक्षेत्राचा आहे त्यामुळे ते सांगतात की, “ बारामतीकरांना आम्ही पाणी पाजले आहे!” अशी अनेक कामे करताना त्यांनी खूप नाव कमाविले आहे.

व्यवसायात असे सुस्थापित झाल्यावर त्यांनी डॉ बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा या संदेशाच्या क्रांतीकारी दिशने वाटचाल केली. जास्तीत जास्त दलित तरुणांनी उद्योगात यावे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. त्यातून त्यांनी दलित उद्यमीच्या प्रश्नाची हाताळणी, संघटन आणि त्यासाठी संघर्ष सुरू केला, जे काम त्यांना खूप मोठ्या सामाजिक राष्ट्रीय उंचीवर घेवून जाणारे ठरते आहे. देशात दलित श्रीमंत उद्यमीच्या यादीत का नाही या प्रश्नाचा शोध घेता घेता त्यांनी दलित चेंबर्स ऑफ कॉमर्सची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. दलित तरुणांनी उद्योगाच्या जगात यावे, पैसा मिळवावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. दलित तरुणांना रोजगाराच्या संधी देणारे खूप काही आहे मात्र त्यांना उद्योगाच्या संधी मिळाव्या यासाठी चेंबर्सची कल्पना त्यांनी साकारली. दलित सहकारी चंद्रभान यांच्या मदतीने त्यानी या संस्थेला मूर्त स्वरुप दिले आणि वाणिज्य आणि व्यापाराच्या क्षेत्रात या क्षेत्रातील तरुणांनी अब्जाधिश व्हावे हा ध्यास घेवून ते काम करत आहेत. जास्तीत जास्त तरुणांनी या क्षेत्रात यावे आणि इतरांचा आदर्श घेवून नवा इतिहास घडवावा असा आमचा प्रयत्न असल्याचे ते सांगतात.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.