सरदार जोधसिंह! एका विस्थापिताच्या मेहनत आणि जिद्दीने शुन्यातून विश्व निर्माण केल्याची प्रेरक कहाणी!
भारत आणि पाकीस्तानच्या फाळणीच्या विषयाने लोकांच्या जीवनावर जो भयाण ओरखडा काढला त्यातून अनेक कथा, कादंब-या आणि साहित्याच्या क्षेत्रातील कलाकृतींचा जन्म झाला. त्यातूनच आताच्या पिढीला त्या काळातील भारतीयांच्या या भळाळत्या जखमेची जाणिव आजही होते आणि उद्याही होत राहील. मात्र अशा जीवन मरणाच्या यातनांमध्येही ज्यांनी आपल्या क्षेत्रात काहीतरी वेगळे करून नाव मिळवले त्यांच्या कहाण्या तर अमर ठरल्या आहेत. त्यांच्या या चिरस्मरणीय कथानकांमधून आजच्या काऴात अडचणींना झेलत वाटचाल करणा-यांना प्रेरणा मिळते. अशीच खरीखुरी कहाणी आहे सरदार जोधसिंग यांची. जोध इंद्रजीत समुहाचे संस्थापक आणि अध्यक्ष सरदार जोधसिंग यांनी फाळणीच्या दु:खाचा सामना केला आहे आणि त्यातून मात करत उभे राहीले आहेत. फाळणी झाली त्यावेळी जोधसिंग यांना पाकीस्तानातून आपल्या परिवारासह सर्वस्व त्यागून निघून यावे लागले. तो पाकिस्तानातून भारतात येण्याचा प्रवास खूपच भयावह होता. त्यांनी मृत्यूचे तांडव पाहिले आणि सहन केले होते, येथे येऊनही त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. पण त्यांनी कधी हार मानली नाही. मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या बळावर आपल्या बहिणीच्या कानातील दागिना विकून पंजाबच्या लुधियाना मध्ये व्यापार सुरू करणा-या जोध सिंह यांनी आज कोट्यावधीचे साम्राज्य उभारले आहे. भारतात विस्थापित म्हणून आलेल्या जोधसिंह यांनी कोलकाताला आपली कर्मभूमी बनविले आणि गायी-म्हशी विकण्याचा खरेदी करण्याचा व्यापार सुरु केला. हा व्यवसाय उभा राहिल्यानंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करून विकण्याचा व्यवसाय केला. पुढे जावून त्यांनी परिवहन, दूरसंचार, लोखंड-पोलाद, शिक्षण, चिकित्सा, विज्ञान तंत्र उद्योग या सा-या क्षेत्रात व्यवसाय करत भरपूर नाव प्रतिष्ठा आणि संपत्ती कमाविली. मुले मोठी झाली त्यावेळी त्यांनाही वेगवगेळ्या जबाबदा-या सोपविल्या. आपल्या या व्यवसायात त्यांनी हजारो लोकांना रोजगार मिळवून दिला. गरजवंताना मदत करताना त्यांनी सामाजिक बांधिलकीचे भानही नेहमी ठेवले आहे. त्यामुळे त्यांची समाजात विशेष ओळख तयार झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून दु:ख सहन करून शुन्यातून पुढे गेलेल्या सरदार जोध सिंह यांच्या कहाणीत इतिहास तर आहेच पण प्रतिकूल स्थितीमध्येही हिंमत ठेवून कसे काम करावे यांची प्रेरणा आजही ते देतात.
फाळणीच्या आधी जोधसिंह यांचा परिवार सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या एका गावात दुध आणि कपड्यांचा व्यवसाय करत असत. विभाजनापूर्वी त्यांच्या कुटूंबात सुख-शांती होती. पण फाळणी झाली त्यात त्यांना गाव, जमीन, घर, व्यवसाय सारेकाही सोडून नाईलाजाने भारतात यावे लागले. जोधसिंह याच्या मनात मात्र आजही फाळणीच्या यातना ताज्या आहेत. त्याकाळातील लुटालुट हिंसाचार त्यांना आजही अस्वस्थ करतो त्यांनी लोकांना सर्वस्व गमाविताना पाहिले आहे. काळीज पिळून टाकणारे आकांत पाहिले आहेत लहान मुले महिला यांच्या किंकाळ्या ऐकल्या आहेत. एका वेळच्या अन्नासाठी लोकांना रडताना आणि लाचार होताना पाहिले आहे. आप्तजनांच्या वियोगाने वेड्यासारखे सतत रडणारे असंख्य लोक पाहिले आहेत.
आमच्याशी बोलताना जोधसिंह यांनी सांगितले की, जितके हिंदू शीख परिवार होते सारेजण पाकिस्तान सोडून हिंदूस्थानात निघाले होते. काहीजण पायी जायला निघाले होते. काही मिळेल त्या वाहनात जागा बघत होते. पण काही लोकांना रस्त्यात लुटून मारले जात असल्याच्या बातम्या येत होत्या. मुसलमानानी शिखांच्याही हत्या केल्याचे पहायला मिळायला लागले होते. स्थिती खूप खराब झाली त्यावेळी त्यांच्या गावातील सर्व शीख बांधव गोळा झाले त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला हे त्यांना आजही चांगले आठवते. निर्णय झाला की रात्री भारतातून एक ट्रक यईल त्यातून सारे निघून जातील. लोक ट्रक येण्याची वाट पहात तयारी करू लागले होते. तेवढ्यात चार मुसलमान जोधसिंह यांच्या घरी गेले त्यांना पाहून सारे घाबरले. त्यांना वाटले की लुटण्यासाठी ते आले असावेत. मात्र त्यानी सहानुभूती देत केवळ मदत देण्यासाठी आले असल्याचे सांगितले. त्यांची तयारी पाहून जोधसिंह यांच्या वडिलांनी त्यांना काय मदत करणार असे विचारले. त्यांनी सांगितले की इथून गेलात तरी रस्त्यात तुम्हाला वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागेल. पण आमचे ऐकाल तर आम्ही तुमच्यासोबत उभे राहू शकतो. त्यावर वडील म्हणाले की काय ऐकायचे? ते म्हणाले की तुम्ही सारे मुसलमान बनाल तर आम्ही तुमचे रक्षण करू. तुम्हाला कुणी मारायला आले तरी त्यांन आम्ही रोखू आणि तुम्ही आमचे आहात असे सांगू. जोधसिंह यांना ही गोष्ट पसंत पडली नाही. त्यांनी मरायची तयारी केली पण धर्म बदलणार नाही म्हणाले. त्यांनी त्या मुसलमानांसमोर त्यांचा एक प्रस्ताव ठेवला त्यांनी सांगितले की जर ते त्यांना आणि त्यांच्या परिवाराला हिदुस्थानात सुरक्षित पोहोचवतील तर त्यांना त्यांची सारी संपत्ती देवून टाकतील. ते केवळ बंदूका आणि आवश्यक वस्तू घेवून जातील. मुसलमानांना ही गोष्ट पसंत पडली त्यांनी त्यांचा हा प्रस्ताव मान्य केला मात्र त्यांनी एक अट घातली त्यांना मशिदीच्या दिशेला बघून शपथ घेण्यास सांगितले. मुसलमांनाना आनंद झाला त्यांना सारी संपत्ती मिळणार म्हणून आनंदाने शपथ घेतली. जोधसिंह यांच्या मते जसे त्यांनी गाव सोडले गावावर मुसलमानाचा हल्ला झाला. अनेकांना जीवे मारण्यात आले. काहीजण पळून जाण्यात यशस्वी झाले. भारताच्या हद्दीत प्रवेश करत असताना मुसलमानांनी जोधसिंह यांच्याही कुटूंबावर हल्ला करण्याचा विचार केला. परंतू ज्या चार मुसलमानांनी अल्लाहच्या नावे शपथ घेतली होती त्यांनी तसे होऊ दिले नाही. जोधसिंह म्हणाले की, त्या लोकांनी आम्हाला इमान दिले होते, त्यामुळे रस्त्यात कुणी ज्यावेळी मारायला येत होते ते त्यांना हे आपले लोक आहेत असे सांगत होते. आम्ही यांना शपथ दिली आहे यांना कुणी काही करणार नाही”.
पाकिस्तानातून भारतात येताना वाटेमध्ये एकदा अशी वेळ आली की त्यात कुणीच जिवंत राहणार नाही असे वाटले होते. एका गावाजवळून ते जात असताना व्हॉलीबॉल खेळत असलेल्या काही मुलांनी आरडाओरडा करून सारा गाव जमा केला. सारे गाववाले रागात होते त्यांना जोधसिंह यांच्या कुटूंबाला मारायचे होते. स्थिती इतकी वाईट होती की हिंदू आणि शीख दिसले की त्यांन मारले जात होते. त्यामुळे जोधसिंह यांच्या घरचे सारे घाबरले होते. सारे गावकरी एकत्र येवून चिडले होते. पण सोबत असलेल्या मुसलमानांनी त्यांना भारतीय सीमेवर सुखरुप पोहोचविले जेथे भारतीय सैन्य त्यांना सुरक्षित घेवून जात होते. जोधसिंह सांगतात की ज्यावेळी भारतीय सैन्याच्या ताब्यात देण्यात आले त्यावेळी सा-यांनी सुटकेचा निश्वास टाकला. भारतीयांना सुरक्षित नेण्याचे काम डोगरा रेजीमेंट करत होती. डोगरा रेजीमेंटकडे येताच काही हिंदूंनी तक्रारी केल्या की त्यांच्या सोबत असलेल्या अनेक मुलींना पाकिस्तान्यांनी पळवून नेले आहे. त्यावेळी डोगरा रेजीमेंटने घोषणा केली की चोवीस तासात त्या मुलींना परत केले नाही तर त्या गावांवर हल्ला केला जाईल. या धमकीचा परिणाम झाला आणि काही मुलींना पाकिस्तानी लोकांनी सोडून दिले. जोधसिंह सांगतात की काहीजणी त्याच्या कुटूंबियांना परत मिळाल्या पण अनेकजणींचे काय झाले ते काहीच समजले नाही.
डोगरा रेजीमेंटजवळ पोहोचल्यानंतर सर्वाच्या जीवात जीव आला मात्र त्यांच्या समस्या अजून काही संपल्या नव्हत्या. पाकिस्तानातील अनेक हिंदू आणि शीख कुटूंब डोगरा सैनिकांच्या ट्रकवर बसून भारताच्या दिशेन जात असताना त्यांच्या काफिल्याच्या पहिल्या गाडीत रेजीमेन्टचे प्रमुख रामसिंह डोगरा होते त्यांच्या गाडीखाली भुसुरूंग आला आणि स्फोटात ते आणि अनेकजण गंभीर जखमी झाले. मात्र रामसिंह यांनी हिंमत दाखवून हुशारी केली ते म्हणाले की मी जखमी आहे ते समोरच्या शत्रूच्या लोकांना समजले नाही पाहिजे नाहीतर ते तुम्हाला जिवंत सोडणार नाही. त्यामुळे उरलेल्या सैनिकांनी मिळून हिमतीने उकाडामंदी गावाच्या दिशेन वाटचाल सुरू ठेवली मात्र तेथे पोहिचल्यावर केवळ प्रेतांचे ढिग पहायला मिळाले जे उचलण्यासाठी देखील कुणी नव्हते. त्यानंतर मात्र ही स्थिती पाहून भारतीय सैनिकांनी वेगाने वाटचाल केली आणि ट्रकमधून लोकांना अमृतसर येथे सुरक्षित पोहोचविले. त्यावेळी सा-यांच्या जीवात जीव आला. जोधसिंह यांच्या मते हा सारा प्रवास अंगावर शहारे आणणारा होता. निरपराध लोकांच्या रक्ताने न्हावून गेलेल्या गावामधील स्थिती पाहता काळजाचा थरकाप आजही उठतो. भारतात लाखो लोक पोहोचत होते त्याच्यासाठी इथेही काही फार चांगली स्थिती नव्हती. सारेच भारतीय सैन्याच्या छावणीत राहात होते. काही जणांना गुरुव्दारात आश्रय मिळाला होता. त्यात जोधसिंह आणि कुटूंबिय देखील होते. त्या सा-यांकडे काहीच सामान नव्हते, भांडी, कपडे, असे मोजके सामान आणि काहींजवळ थोडे दागिने होते. पाकिस्तानातून हे सारे हिंदू शीख आपले सारे काही सोडून आले होते.
बरेचजण असेही होते की ज्यांना ते जिवंत आले याचेही काही वाटत नव्हते कारण त्याच्या घरातील असंख्यजण मारले गेले होते. त्यांचे सर्वस्व लुटले गेले होते. देशाचे विभाजन झाले होते मात्र अनेकांच्या जीवनाचे विभाजन झाले होते. स्वकीय एकतर मारले गेले होते किंवा कायमचे नाहिसे झाले होते. अनेकांनी डोळ्यासमोर आपल्या प्रियजनांचे खून होताना पाहिले होते. सारेजण लाचार, निराश हताश शोषित, दु:खी, पीडित असेच होते. त्यांना आता ही देखील चिंता होती की शेवटी कधीपर्यंत सरकार किंवा गुरुव्दारा त्यांचे पालन पोषण करणार होते. हीच चिंता आता जोधसिंह यांना देखील होती. काही दिवस झाले त्यानंतर त्यांना ही जाणिव झाली की काहीतरी करावे लागणार होते. आपल्या आणि कुटूंबियांच्या काही राहण्या जगण्याचा आधार शोधण्याचा प्रयत्न करण्यास ते विवश होते त्यातून त्यांनी शोध सुरु केला. जोधसिंह यांना एक दिवस त्यांच्या गावातील काहीजण दिसले. त्यांना पाहून ते धावत त्यांच्याजवळ गेले आणि त्यांची विचारपूस केली. त्यांनी त्यांना सांगितले की त्यांच्यापैकी अनेकजण लुधियाना येथे राहात आहेत त्या ठिकाणी राहणारे मुसलमान पाकिस्तानात परत गेल्याने शेती घरे खाली आहेत. अनेक शीख मुसलमान त्याच घरात राहतात आणि धान्य, भाज्या, फळे शेतातून मिळत आहेत. ते ऐकून जोधसिंह यांचे मन भरून आले त्यांनी विचारणा केली की आम्ही देखील येवू शकतो का? आमच्यासाठी देखील काही घर रिकामे मिळू शकते का? त्यावर एकाने सांगितले की त्या भागात अजून खूप घरे, शेत जमिनी खाली पडल्या आहेत. शेती देखील मोठ्या प्रमाणात खाली पडल्याचे आणि कुणीही येवून आपली जागा पक्की करु शकतो हे ऐकून जोधसिंह यांनी आपल्या घरच्यांना ही गोष्ट सांगण्यासाठी धाव घेतली, तेथे जावून त्यांनी सा-यांना ही बातमी दिली आणि बहिण भाऊ यांच्यासह कुटूंबाला सोबत घेवून लुधियाना गाठले. लुधियानाला गेल्यावर त्यांनी गाववाल्यांना विचारणा केली की त्यांना कोणते घर मिळेल त्यावर त्यांना आवडेल त्या घरात राहता येईल असे सांगण्यात आले. मग त्यांच्या कुटूंबियांनी एका स्वच्छ चांगल्या घराची निवड केली आणि ते आपलेसे केले.
जोधसिंह यांना घर तर मिळाले होते मात्र उत्पन्नाची चिंता होतीच. त्यांनी पुन्हा गावातल्या लोकांना विचारणा केली तर समजले की ते शेतात जातात आणि बटाटे आणून विकतात त्यातून गुजराण करतात. मग त्यांनी त्यांच्या सोबत शेतात जाण्याचा मार्ग निवडला. एका हातात विळा आणि गोणी घेवून ते शेतीच्या दिशेने निघाले. त्यावेळी त्यांनी पाहिले की खूप मुसलमान त्या गावातून पाकिस्तानच्या दिशेन निघाले होते त्या सा-यांच्या चेह-यांवर पाकिस्तानातून भारतात आलेल्यांच्या चेह-यावर जे भाव होते तेच दिसत होते. जोधसिंह यांनी मुसलमानांच्या या रांगेत एका वृध्दाला म्हैस घेवून जाताना पाहिले. त्या वृध्दाला ती म्हैस घेवून जाताना खूप कष्ट पडत होते. जोधसिंह यांना त्यात एक संधी दिसली. ते त्या मुसलमानाकडे गेले आणि म्हणाले की ही म्हैस मला विकणार का? त्या वृध्दाच्या डोळ्यात चमक दिसली त्याने होकार दिला ते पाहून ते म्हणाले की माझ्याजवळ केवळ चाळीस रुपये आहेत तेवढ्या पैश्याना विकणार का? वृध्द म्हणाल की म्हैस चालत नाही, तुला हवी तर घे आणि पैसे मला दे. ते ऐकून जोधसिंह यांनी त्याला तेथेच उभे राहण्यास सांगितले आणि ते पैसे घेण्यासाठी घरी गेले मात्र तेवढे पैसे घरात नव्हते, मग त्यांनी बहिणीच्या कानातल्या दागिन्यांना विकून त्यातून १०२ रुपये मिळवले, त्यातले ४० रुपये देवून म्हैस खरेदी केली, आणि तिथूनच त्यांचा व्यावसायिक प्रवास सुरु झाला.
जोध सिंह यांच्या व्यवसायाची सुरुवात ही अशी झाली, त्यांच्या पाकिस्तानातल्या गावात त्यांच्या कुटूंबाचा कपडा आणि दूध विकण्याचा धंदा होता त्यामुळे गायी म्हशी होत्या, त्यांचे बालपण गायी म्हशी पाहण्यात गेल्याने त्यंाचा त्याबाबत खूप अभ्यास होता इतका की नुसते पाहून ते गायी म्हशीचे अचूक वय सांगू शकत होते त्याचमुळे त्यांना ती म्हैस दिसली त्यावेळी त्यात संधी दिसली होती. त्यांना माहिती होते की ती म्हैस त्या माणसाला नकोशी झाली आहे आणि तो मिळेल त्या किमतीला तिला विकू शकेल म्हणूनच त्यांनी त्याला चाळीस रुपये सांगितले मात्र त्यांना माहिती होते की तिची किंमत दोनशेच्या खाली नव्हती. चाळीस रुपयांची म्हैस घेवून ते निघाले होते त्याच वेळी एकजण त्यांन दूध विकताना दिसला, त्यांना वाटले दूधवाला आहे म्हैस घेवू शकेल म्हणून त्यांनी त्याला थेट तसे न विचारता विचारणा केली की गायी म्हशीचा बाजार कुठे आहे? मी पाकिस्तानातून आलो आहे आणि ही म्हैस मला विकायची आहे. त्यावर दुधवाला म्हणाल की मला ती म्हैस विकून टाका ना. त्यावर ते त्याला ती देण्यास लगेच तयार झाले ते पाहून त्याला शंका आली तो म्हणाला की, ही चोरून तर नाही आणलीस ना? जोधसिंह हिंमत ठेवून म्हणाले की, काय अजब बोलता राव मी पाकिस्तानातून आलो मला म्हैस बाजार कुठे आहे ते सांगा म्हणालो तर तुम्ही मला चोरच ठरवून टाकता? नका सांगू हवं तर मला मी दुस-या कुणाला तरी विचारेन आणि म्हैस त्यांना विकेन जे घेतील. चोरीचा मालअर्ध्या किमतीला विकतात मी तसे करणार नाही मी पूर्ण किंमत घेणार, असे म्हणत जोध सिंह पुढे निघाले. जोध सिंह थोडे दूर गेले होते त्यावेळी तोच माणूस सायकल वरून धापा टाकत आला आणि म्हणाला की, कितीला देणार म्हैस? जोधसिंह यांनी तीनशे रुपयांना विकणार असे सांगितले. त्यावर तो माणूस भाव कमी करायला लागला, त्याने घासाघीस केल्याने जोधसिंह यांनी वीस रुपये कमी केले मात्र शेवटी त्याने ती २३५ रुपयांना घेण्यास तयारी दाखवली त्यावर तेवढे रुपये घेवून त्यांनी त्याला म्हैस देवून टाकली. आपल्या व्यापाराच्या पहिल्याच दिवशी त्यांना दोनशे रुपयांचा फायदा झाला होता. या उत्साहामुळे ते पुन्हा एकदा त्या मुसलमानांच्या काफिल्या जवळ गेले आणि यावेळी दोन गायी ६० रुपयांना विकत घेतल्या. त्या त्यांनी जनावरांच्या बाजारात नेवून विकल्या त्यातून त्यांना चांगला फायदा झाला. पहिल्याच दिवशी चांगली कमाई झाल्याचे समाधान त्यांना मिळाले.
त्यांच्या परिवाराच्या समोरच्या ब-याच समस्या त्याने सुटल्या होत्या. या अनुभवावरून त्यांनी विचार केला की ते हाच व्यवसाय करतील, कारण त्यात त्यांनी काही गुंतवणूक केली नव्हती आणि फायदा मिळवला होता. त्यात फारशी जोखीम देखील नव्हती ते दिवस इतके वाईट होते की कुणी कुणावर विश्वासही करत नव्हते. पण जोधसिंह यांनी त्यातही धीराने काम केले. आपल्या यशाने उत्साहित जोधसिंह रोज बाजारात जावून संधी शोधू लागले त्याच बरोबरीने त्यांनी तेथे सुरु असलेल्या व्यवहाराबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एक दिवस अचानक त्यांना त्यांनी ज्याला दोन गायी विकल्या त्या माणसाचा नोकर दिसला त्याला त्यांनी सहज बोलता बोलता गायींचे काय केले? म्हणून विचारणा केली त्याने आधी सांगण्यास नकार दिला मात्र त्यांच्याकडून गोड बोलून त्यांनी छडा लावला की त्या गायी त्यांनी बंगाल मध्ये नेवून दहापट जास्त किमतीला विकल्या होत्या. हे ऐकून जोधसिंह यांना धक्काच बसला त्यांनी त्याच क्षणी निर्णय घेतला की ते देखील या नंतर कोलकाता येथे जावून गायी विकतील. पंजाब मधील गायी म्हशीला बंगालमध्ये पाच ते दहापट जास्त भाव आहे हे समजल्या नंतर त्यांनी लुधियाना वरून कोलकाता येथे जाण्याची तयारी केली. ११नोव्हेंबर १९४८ला ते दोन गायी घेवून कोलकाता येथे पोचले. त्या गायी बाजारात नेवून विकल्या त्यांनी त्या नोकराकडून जी माहिती घेतली होती ती खरीच निघाली होती. पंजाबच्या गायी म्हशींना चांगल्या भावाने येथे खरेदी केले जात होते. हे पाहून जोधसिंह यांनी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी कोलकाता येथे स्थायिक होण्याचे ठरविले. मग त्यांनी हळुहळू धंद्यात जम बसविला. त्यांचा लहान भाऊ लुधियानातच राहिला, तो तेथून त्यांना गायी म्हशी खरेदी करून पाठवत होता आणि त्यांना ते कोलकाता येथे विकत होते. पुढे जावून जोधसिंह यांनी दुधाचा व्यवसाय सुरु केला. आपला तबेला सुरु केला आणि दुधासोबत दुग्धजन्य पदार्थ देखील विकण्यास सुरुवात केली. काही वर्षातच ते खूप श्रीमंत आणि प्रसिध्द झाले. सन १९६७-६८ मध्ये जोधसिंह बंगालमध्ये सरकारी डेरीला सर्वाधिक दूध विकणारे व्यवसायी बनले होते. त्याचे नाव दिवसेंदिवस मोठे होते गेले. त्यांच्याकडे काम करणा-यांची संख्या वाढत गेली.
त्याच दरम्यान अशी एक घटना झाली त्यातून त्यानी शिक्षणक्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. जोधसिंह यांनी पंजाबशी असलेले नाते कायम ठेवून कोलकाता येथे बस्तान बसविले होते. हाच त्यांचा आता आपला प्रदेश होता. पत्नी सतनाम कौर, तीन मुलगे आणि दोन मुली यांना घेवून ते कोलकाता मध्येच राहू लागले होते. ते फारशे शिकले नाहीत पण आपल्या मुलांनी खूप शिकावे त्यासाठी त्यांनी परदेशातही जावे अशी त्यांना आस होती. मोठा मुलगा तरनजितसिंह यांच्याकडून त्याना अपेक्षा होत्या, मात्र तरनजितसिंह यांना अभ्यासापेक्षा खेळात जास्त रुची होती. वडीलांप्रमाणेच त्याचेही इंग्रजी कच्चे होते. मात्र जोधसिंह यांना त्याला लंडनला शिकण्यासाठी पाठवायचे होते. त्यामुळे त्यांनी त्याला इंग्रजी माध्यमाच्या कोलकाता येथे असलेल्या एका प्रतिष्ठीत शाळेत प्रवेश देण्याचे ठरविले मात्र त्या शाळेत पध्दत वेगळी होती, ते पालकांच्या मुलाखती नंतर प्रवेश देण्याबाबत निर्णय घेत असत. मुलाखत घेणारी व्यक्ती इंग्रजी महिला होती तिच्या इंग्रजी उच्चारामुंळे ती काय बोलते ते जोधसिंह आणि त्यांच्या मुलाला समजलेच नाही, त्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे जोधसिंह यांना फार दु:ख झाले. त्यांना कसेही करून तेथेच प्रवेश हवा होता. मग कुणीतरी त्यांना सरदार दयालसिंह या त्या भागातील बड्या आसामीला त्यांनी भेटून प्रवेश देण्याबाबत सांगितले. दयालसिंह यांची त्या शाळेत खूप इज्जत होती त्यांच्या शब्दाला मान होता. दयालसिंह म्हणाले की प्रथम त्यांच्या मुलाला इंग्रजी आले पाहिजे, त्यामुळे जोधसिंह यांनी त्याला इंग्रजीची शिकवणी लावली. मात्र हा त्रास लक्षात ठेवून त्यांनी मनात निर्णय घेतला होता की एक शाळा सुरू करायची. त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की ते शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नात होते मात्र त्यावेळी बंगालमध्ये केवळ सरकारी शाळांना परवानगी होती आणि खाजगी शाळा नव्हत्या त्यामुळे त्यांना आपले स्वप्न मनात ठेवावे लागले होते.
जोधसिंह श्रीमंत होते, स्वाभिमानी होते, आपल्या सारखे अनेकजण असतील ज्यांच्या मुलाना विशेषत: गरीबांच्या मुलांना कुठे प्रवेश मिळत असेल असा विचार ते करू लागले. एक अशी शाळा असावी जेथे कोणत्याही भेदभावाशिवाय प्रवेश मिळेल असा त्यांनी विचार केला. त्यांचे हे स्वप्न मोठे झाल्यावर त्यांच्या मुलांनी पूर्ण केले. ज्यावेळी प. बंगाल सराकारने खाजगी तंत्रविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तरनजीत सिंह यांनी अर्ज केला तो मंजूर झाला. गायी म्हशी विकून त्याचे दूध विकून व्यवसाय करणा-या पाकिस्तानमधून आलेल्या विस्थापित माणसाने एकामागो एक महाविद्यालयांची मालिका सुरु केली त्यात सा-या शाखांचे शिक्षण दिले जाते, अगदी बिझनेस स्कुल देखील त्याने सुरू केले. जेआयएस या प्रसिध्द नावाने त्यांच्या शैक्षणिक संस्था चालतात ज्या पूर्व भारतामध्ये नावाजलेल्या शिक्षण संस्था म्हणून प्रसिध्द आहेत. त्यात २५हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. फारसे शिक्षण नसताना जोधसिंह यांनी व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकीचे जे काम केले त्यातून कोलकातामध्ये त्यांची समाजात चांगली प्रतिष्ठा आहे इतकी की गुरुव्दारामध्ये एकदा काही तरी वर्चस्वाची भांडणे झाली, प्रकरण दंग्यावर आले त्यावेळीही त्यांनी केलेल्या मध्यस्थीला मान देत दोन्ही बाजूच्या लोकांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वाद मिटवून पुन्हा एकत्र राहू लागले अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. आज जोधसिंह यांनी परिवहन, लॉजिस्टिक, लोखंड पोलाद, बांधकाम दूरसंचार मनोरंजन पायाभूत सेवा या सा-या क्षेत्रात कंपन्या सुरु केल्या ज्या फायद्यात चालतात आणि कोट्यावधींची उलाढाल करतात. पूर्व भारतामध्ये नामी उद्योजक म्हणून त्यांना मान आहे. हजारो लोकांना त्यांनी रोजगार दिला आहे तर सामाजिक बांधिलकी म्हणून अनेकांना ते मदत करत असतात. त्यांच्याजवळ मदत मागायला गेला तो कधी निराश होत नाही अशी त्यांची ख्याती झाली आहे. त्यामुळे लोक सन्मानाने त्यांना बाबूजी म्हणतात.
सरदार जोधसिंह यांना पंजाबमधून कोलकाता येथे येवून ६८ वर्ष झाली. तबेला पासून टेक्नॉलॉजी पर्यंत सारे काही त्यांनी शुन्यातून निर्माण केले. त्यांची मुले आज कोट्यावधींचा उद्योग व्यवस्थित चालवितात. फाळणीच्या वेळी घर सोडून आलेल्या माणसाने अनेकांना घरं दिले तर अनेकांना घरासाठी उभे केले आहे. त्यांचे निश्चय आजही पोलादी असतात जरी त्याचे वय ९० वर्षाचे झाले असले तरी, त्याची मुले त्यांना विचारल्याशिवाय आजही कोणताही मोठा निर्णय घेत नाहीत. चेअरमन म्हणून ते सर्व कंपन्यांच्या कामकाजात सल्ला देतात. गतकाळाच्या स्मृती त्याच्या मनात आजही ताज्या असतात. ते म्हणतात, देव संधी देतो ती प्रामाणिकपणे घेतली पाहिजे, जर प्रामाणिक प्रयत्न केले तर यश येणारच. ते म्हणतात की, “मी कुणाला कधी धोका दिला नाही, कुणाचे पैसे घेतले नाही, लोकांनी माझी देणी बुडविली त्यावेळी देखील मी वेगळ्या पध्दतीने ती वसुल करुन घेतली जे मेहनत करत नाही त्यांना देव साथ देत नाही हे मला माहिती आहे” मुलाखती दरम्यानही त्यानी वारंवार देवाचे आभार मानले. ते म्हणतात, संकटे आली पण त्यानेच ती दूरही केली. देवाचा मोठा आशिर्वाद मला मिळाला, त्यानेच मला चांगली माणसे दिली, संधी दिली चांगला परिवार दिला माझ्या मुलांना मी सुरुवातीच्या काळात पैसा दिला पण त्यानी नंतर मला कधी काही मागितले नाही. ते चांगले काम करत आहेत.
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.